Nashik News : नाशिकच्या एम जी रोडवरील (M G Road) मोबाईल मार्केट (Mobile Market) स्थानिक आणि परप्रांतीय वादामुळे बंद होते. यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली होती. आज मार्केट उघडताच मनसेकडून (MNS) राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलक फाडण्यात आले आहेत. 


राजस्थानी व्यापाऱ्यांचे एमजी रोडवर सुमारे 250 मोबाईल रिपेअर, स्पेअरपार्ट आणि नवीन मोबाईलची दुकाने आहेत. जिल्हाभरातील मराठी मोबाईल व्यावसायिक एम जी रोडवरील राजस्थानी व्यापाऱ्यांकडून होलसेल भावात मोबाईल ऍक्सेसरीज खरेदी करतात. मात्र एका मराठी व्यावसायिकासोबत झालेल्या वादानंतर राजस्थानी व्यापाऱ्यांनी एकत्र येत त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. यामुळे नाशिकमध्ये स्थानिक आणि परप्रांतीय वाद रंगल्याचे दिसून आले होते. 


परप्रांतीयांविरोधात मनसे पुन्हा आक्रमक


आज दुपारी मनसेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी एम जी रोड गाठले. परप्रांतीयांविरोधात मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलक मनसेकडून फाडण्यात आले आहे. राजस्थानी व्यापारी स्थानिक मराठी व्यापाऱ्यांवर अन्याय करत असल्याचे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे. मनसेकडून फलक फाडण्यात आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


एमजी रोडवरील लाखोंची उलाढाल ठप्प


शहर परिसरातील नागरिक तसेच छोट्या स्‍वरुपातील मोबाईल विक्रेते येथे मोठ्या संख्येने वस्‍तू खरेदीसाठी येतात. या परिसरात सुमारे दीडशेहून अधिक छोटे-मोठे व्‍यावसायिक कार्यरत असून, दुकाने दोन-ते तीन दिवस बंद असल्‍याने सुमारे 70 ते 80 लाखांची उलाढाल टप्प झाली होती. 


कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी


दरम्यान, शहरातील एमजी रोड परिसरात असलेल्या मोबाइल साहित्य विक्री व दुरुस्ती बाजारपेठेत मराठी विरुद्ध परप्रांतीय व्यावसायिक असा वाद उफाळून आल्याने पोलिसांनी त्यात उडी घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशा स्पष्ट सूचना व्यावसायिकांना दिल्या आहेत. तर, राजस्‍थानी व्‍यावसायिकांकडून आपल्‍या मूळगावी असलेल्‍या लोकप्रतिनिधींच्‍या माध्यमातून थेट केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे तक्रार केल्‍याची माहिती मिळत आहे. तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून या वादावर मध्यस्थी केली जाणार असल्याचे समजते. त्यांनी परप्रांतीय आणि स्थानिक व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली असून लवकर संयुक्त बैठक घेणार असल्याचे वृत्त आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


Vijay Shivtare: मोठी बातमी : विजय शिवतारेंनी दुसरा पत्ता टाकला, वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार


Mahayuti Seat Sharing: बैठकांवर बैठका, तिढा कायम; महायुतीच्या जागावाटपाचं भिजत घोंगडं, दिल्ली दरबारी तोडगा निघणार?