Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीदरम्यान चोरटे 'मालामाल', नाशिकमधून लाखोंचा ऐवज लंपास
Nashik Crime News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली होती. या रॅलीचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला.
Manoj Jarange Patil Shantata Rally : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात शांतता रॅली (Shantata Rally) काढली होती. या रॅलीचा समारोप मंगळवारी नाशिकमध्ये झाला. नाशिकमधील शांतता रॅलीदरम्यान चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मराठा आरक्षण शांतता रॅलीला मंगळवारी तपोवनातून मार्गस्थ झाला होता. या मोर्चामध्ये शहरासह जिल्हाभरातून समाज बांधव सहभागी झालेले होते. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सुमारे पाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत. याप्रकरणी पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिकमधून लाखोंचा ऐवज लंपास
शांतता रॅलीत ज्ञानेश्वर कारभारी शिंदे (रा. वनसगाव, ता. निफाड) हे त्यांच्या सहकारी मित्रांसह आले असता, त्यांच्या गळ्यातील सोन्याची साडेचार तोळ्याची ९० हजार रुपयांची चेन गर्दीमध्ये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. तसेच कृष्णा वामन टर्ले (63, रा. हिरावाडी रोड) यांची 3 तोळ्याची 60 हजारांची चेन, ओमकार अशोक वाबळे (21, रा. हिरावाडी) यांची 46 हजारांची सोन्याची चैन आणि नानासाहेब आनंदराव मोरे (50, रा. करंजवण, ता. दिंडोरी) यांची 20 हजारांची सोन्याची चेन, सचिन शिवाजी थोरात (32, रा. पाटपिंप्री, ता. सिन्नर) यांची 18 हजारांची सोन्याची चेन, सुनील भाऊसाहेब कदम (45, रा. निपानी मळा, ओझर, ता. निफाड) यांची दोन तोळ्याची 40 हजारांची चेन, दिनकरराव पंडितराव भोसले (67, रा. सारुळे, ता. निफाड) यांची 50 हजारांची अडीच तोळ्याची चेन, आशा बाळासाहेब चौधरी (49, रा. ब्रीजनगर, जेलरोड) यांच्या गळ्यातील 30 हजारांची दीड तोळ्याची सोन्याची पोत असा 3 लाख 54 हजार रुपयांचे सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव पंढरीनाथ ढोली (59, रा. वावरे नगर, कामटवाडा) यांची 30 हजारांची सोन्याची चेन, सौरभ देवचंद महाले यांची 60 हजारांची सोन्याची चेन, तर सीमा माधव पिंगळे यांची 60 हजारांची सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लंपास केले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
आणखी वाचा