Nashik Crime : नाशिकमध्ये मटका व्यवसाय सुरू करण्यासाठी मागितली 80 हजारांची लाच, दोन पोलीस शिपाई ताब्यात
Nashik Crime : मटका व्यावसाय सुरू करण्यासाठी अवैध व्यावसायिकाकडे 80 हजारांची लाच मागताना वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या हवालदाराला तडजोडीअंती 40 हजार रुपये घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
Nashik Crime : मटका व्यावसाय सुरू करण्यासाठी अवैध व्यावसायिकाकडे 80 हजारांची लाच मागताना वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या हवालदाराला तडजोडीअंती 40 हजार रुपये घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) तालुक्यातील वडनेर भैरव येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून जवळ असलेल्या शिरवाडे शिवारात मटका व्यवसाय सुरु करण्यासाठी सहाय्यक पोलिसांच्या सांगण्यावरून लाच घेताना दोन पोलीस शिपायांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस ठाण्याच्या आवारात ही कारवाई केली. किसन रमेश कापसे, संतोष दिनकर वाघ असे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Nashik) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अवैध व्यावसायिक असून त्याला वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिरवाडे फाटा येथे कल्याण बाजार मटक्याचा व्यावसाय सुरू करायचा असल्याचे त्याने सांगितले. पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने नियुक्त केलेले संशयित किसन कापसे आणि संतोष वाघ यांना भेटण्यास सांगितले. दोघांनी तक्रारदार व्यावसायिकाकडे 80 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 40 हजार रुपये मागितले.
त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तक्रारदाराच्या तक्रारी नुसार 40 हजार रुपये देण्यासाठी फिर्यादीसह लाचलुचपत विभागाचे पथक कारवाईसाठी गेले असता वरिष्ठ अधिकाऱ्याने दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी पथकाने वडनेर भैरव पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला आणि दोन्ही पोलिसांना तक्रारदारांकडून 40 हजारांची लाच घेताना बेड्या ठोकल्या.
ही निरीक्षक गायत्री जाधव, प्रफुल्ल माळी, प्रकाश महाजन यांच्या पथकाने अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या कारवाईने ग्रामीण भागात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याचे अधोरेखीत झाले. अधीक्षकांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन केल्याचा दावा फोल ठरल्याची चर्चा ग्रामीण पोलिस दलात सुरू आहे.
ग्रामीण भागात सुळसुळाट
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या लाच घेताना पकडल्याच्या अनेक घटना मागील काही दिवसांत उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलीस दलात लाच घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र या घटनेवरून स्पष्ट होते. त्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी याकडे आवर्जून लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा अशा पद्धतीने अवैध व्यवसायांना पाठबळ मिळेल, शिवाय गुन्हेगारीला खतपाणी मिळते.