(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये फिरते पशुवैद्यकीय युनिट जनावरांना ठरतेय वरदान, अशी आहे हेल्पलाईन
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) फिरते पशुवैद्यकीय युनिट जनावरांना वरदान ठरत असून आता हि सेवा त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातही मिळणार आहे.
Nashik News : पावसाळा तोंडावर आला असून अशावेळी पावसाळ्यात जनावरांना उपचार मिळणे कठीण होऊन बसते. अनेक ठिकाणी तर पशु वैद्यकीय दवाखाने नसल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ पाहायला मिळते. मात्र इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या फिरते पशुवैद्यकीय युनिटमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सुविधांची वाणवा आहे. मग त्यामध्ये ग्रामीण रुग्णालये असोत कि पशु वैद्यकीय दवाखाने. अनेकदा नागरिकांवर उपचार करणे सोपे असते मात्र जनावरांवर उपचार करणे अवघड होऊन बसते. या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. दरम्यान वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री पशु आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात फिरते पशुवैद्यकीय युनिट कार्यान्वित झाले. या तालुक्यात आदिवासी लोकसंख्या जास्त असल्याने आणि डोंगराळ भूभाग असल्याने मोबाईल युनिट कार्यान्वित करण्यात आले. येथील शेतकऱ्यांना वाहतुकीच्या सोयीअभावी आणि आणि दुर्गम भागामूळे जनावरांची वाहतूक करणे परवडत नसल्याने या फिरत्या पशुवैद्यकिय दवाखान्याची गरज होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने ही सेवा सुरू केली होती. यात 1,300 पेक्षा जास्त ओपीडी आणि 200 पेक्षा जास्त आपत्कालीन कॉल्सला प्रतिसाद सेवा पुरविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे फिरते पशुवैद्यकीय युनिटची सेवा आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातही मिळणार आहे. नाशिक आदिवासी आयुक्तालयाच्या माध्यमातून आदिवासी तालुका असलेल्या त्र्यंबकेश्वर तहसीलपर्यंत ही सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोबाईल युनिटचा मार्ग लवकरच निश्चित करण्यात येईल, अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बी.आर.नरवडे यांनी दिली. जनावरांच्या उपचारासाठी मोबाईल व्हॅन गावातच पोहोचणार असून यापूर्वी राज्यात अशा अनेक मोबाईल व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच त्यांचे कॉल सेंटरही केले जाणार आहे. ज्यामध्ये पशुपालकांना थेट संपर्क साधण्याची सुविधा मिळणार आहे.
अशी आहे फिरती मोबाईल व्हॅन
मोबाइल युनिटमध्ये ट्रायनोक्युलर मायक्रोस्कोप, टेबलटॉप सेंट्रीफ्यूज मशीन, पोर्टेबल स्टेरिलायझर्स, रेफ्रिजरेटर, जनावरांसाठी रुमेनोटोपी आउटफिट सेट, ट्रस आणि चेन पुली आणि इतर साहीत्यासह 75 हून अधिक विविध प्रकारची उपकरणे आहेत. मोबाइल युनिट गर्भधारणा निदान, वंध्यत्व निदान, लहान शस्त्रक्रिया आणि मोठ्या शस्त्रक्रिया नियंत्रित पद्धतीने, नियमित ओपीडी आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास मदत करू शकते. प्रायोगिक तत्वावर ही मोबाईल युनिट सुरू केल्याने ते यशस्वी ठरले आहे.
इमर्जन्सी आहे, 1962 वर कॉल करा
लोक टोल फ्री क्रमांक 1962 वर कॉल करून ही सेवा मिळवू शकतात. टेलिफोन ऑपरेटर नाव, पत्ता आणि आजार किंवा अपघाताच्या प्रकाराची माहिती घेईल. त्यानंतर मोबाईल युनिटच्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना कोणत्या प्रकारची परिस्थितीला सामोरे जायचे आहे आणि ठिकाण सांगितले जाते.
मार्च 2022 पर्यंतची सेवा
दरम्यान इगतपुरी तालुक्यात वर्ष[पूर्वी सुरु झालेल्या या मोबाईल युनिटच्या माध्यमातून जवळपास 1319 ओपीडी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर निर्बिजिकरन 20, किरकोळ शस्त्रक्रिया 20, वंध्यत्व निदान 20, मोठी शस्त्रक्रिया 01, आपत्कालीन 220 अशा सेवा देण्यात आल्या आहेत. ही सेवा मार्च 2022 पर्यंत देण्यात आली आहे.