Nashik Agriculture College : नाशिकच्या मालेगाव कृषी विज्ञान संकुलात तीन नवीन महाविद्यालये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Nashik Agriculture College : नाशिकच्या (Nashik) मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय साकारण्यात येणार आहे.
![Nashik Agriculture College : नाशिकच्या मालेगाव कृषी विज्ञान संकुलात तीन नवीन महाविद्यालये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय Maharashtra News Three new colleges in the Agricultural Science Complex in Nashik Nashik Agriculture College : नाशिकच्या मालेगाव कृषी विज्ञान संकुलात तीन नवीन महाविद्यालये, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/10/4b95f15b9ba50eab91e10c9cec609abc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Agriculture College : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही तीन महाविद्यालये सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास सोमवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची 18 वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे नाशिकच्या मालेगाव येथील कृषी विज्ञान संकुलात तीन महाविद्यालये साकारण्यात येणार आहे. यामध्ये कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय या तीन महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. दरम्यान यंदाच्या वर्षांपासून अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान मालेगाव तालुक्यातील मौजे काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल निर्मितीस तसेच कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या विद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही पाच महाविद्यालये सुरु करण्यास 26 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली होती. 2020-21 पासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, 2021-22 पासून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरु झाले आहे. उर्वरित तीन महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
अशी असणार प्रवेश क्षमता
कृषी महाविद्यालय आणि उद्यान विद्या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता प्रत्येकी 60 असून अभ्यासक्रमाचा कालावधी 04 वर्षांचा आहे तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 40 विद्यार्थ्यांची असून अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षांचा आहे. या महाविद्यालयांच्या निर्मितीकरिता अंदाजे 490 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कृषी महाविद्यालयांचा उद्देश
कृषी विज्ञान संकुलांतर्गत कृषी शिक्षणाबरोबरच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन आणि निर्माण केंद्र असे विविध कृषी विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतील. कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ग्रामपातळीवरील विस्तार, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक, आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणे, कृषी आधारित स्टार्टअप्स सुरु करणे यासारख्या बाबी साध्य करणे यामुळे शक्य होईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)