Nashik Consumer Center : नाशिकमध्ये सुरु झालंय देशातील पहिलं ग्राहक प्रबोधन केंद्र
Nashik Consumer Center : मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी नाशिकमध्ये देशातील पहिलं ग्राहक प्रबोधन केंद्र सुरु झालंय
Nashik Consumer Center : वजनात गैरव्यवहार करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाने राज्यातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये उभारले आहे. आजपासून या ग्राहक प्रबोधन केंद्राची सुरवात झाली असून ग्राहकांची कशी फसवणूक होते, याच्या प्रबोधनावर भर देण्यात आला आहे.
नाशिक येथील वैद्यमापन शास्त्र, नाशिक मनपा प्रशासन, ट्रॅफिक पार्क यांच्या कल्पनेतून हे प्रबोधन केंद्र उभारले गेले आहे. तर तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ.सिंगल यांच्या पुढाकाराने हे केंद्र साकारत आहे. ट्रॅफिक पार्क, मुंबई नाका, या संस्थेच्या आवारात हे दालन आता सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. शाळा-कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा करता येऊ शकतो. त्यासाठी वैद्यमापन विभागही प्रयत्न करणार आहे. तसेच प्रत्येक ग्राहकाने या केंद्रास भेट देऊन वजनासंदर्भात इत्यंभूत माहिती जाणून घेणे गरजेचे असून त्यातून त्यांची वजनाबाबतीत फसवणूक होणार नाही, हे लक्षात येईल.
विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना वजनकाट्याबाबत असलेल्या नियमाबाबत फारशी माहिती नसते. अनेकदा फसवणूक झाल्यावर तक्रार कुणाकडे करायची याचीही माहिती नसते. या प्रबोधन केंद्रातील पहिले दालन काय करावे? काय करू नये ही संकल्पना समोर ठेऊन तयार केले आहे. यात दुकानात गेल्यानंतर ग्राहकाने काय दक्षता घ्यावी, याची माहिती दिली आहे. यात इंधन पंपावरील होणाऱ्या फसवणुकीसह गॅस सिलिंडरची माहिती येथे देण्यात आली आहे. सिलिंडरच्या वजनात कसा घोळ केला जातो, त्यासाठी काय तपासणी करावी, याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या दालनात वैध, अवैध वजने मापे व उपकरणे याची माहिती देण्यात आली आहे.
माहितीच्या अभावाने फसवणूक
दरम्यान नाशिक शहर जिल्ह्यात ग्राहक मंचाकडे अनेक विषयांबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यावर अधिक भर देण्यात येत होता. मात्र बहुतांश प्रकरणात माहिती नसल्याचे अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ग्राहकांना योग्य तो सल्ला मिळावा यासाठी देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण ची व्याप्ती लक्षात घेता कायमस्वरुपी ग्राहक प्रबोधन केंद्र सुरू करण्याची नितांत आवश्यकता होती.त्यानुसार तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ.सिंगल यांच्या पुढाकाराने हे केंद्र साकारत आहे.
केंद्राचे उद्दिष्ट
आयोजकांच्या मतेग्राहकांचे शोषण नेहमी त्यांच्या अज्ञानामुळे होत असते. ग्राहक हक्क व कायदयाची माहिती ग्राहकापर्यंतर पोहचवल्यास सदर शोषण लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. ग्राहकांना सहज वैद्यमापन कायदा समजावा, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हे प्रबोधन केंद्र तयार केले आहे. ऑडीओ व व्हिडीओच्या द्वारे, मनोरंजनाच्या माध्यमातनू सर्व माहिती प्रस्तूत करणे. या प्रबोधन केंद्रास भेट दिल्यावर ग्राहकांना माहिती मिळू शकेल. शासन व ग्राहक यांचे सेतू तयार करणारी यत्रंणा अस्तित्वात नाही. याही त्रुटी या केंद्रामुळे दूर होईल. सदर केंद्र हे देशातील पहिले कायमस्वरूपी ग्राहक प्रबोधन केंद्र असुन असे पहिले केंद्र उभारण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे.