(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिक मनपामध्ये देशभक्तीचा गजर, ढोल-ताशासह देशभक्तीची गाणी अन सायकल रॅली
Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या (Independence Day) निमित्ताने नाशिक मनपामध्ये (Nashik NMC) ढोल वादन, देशभक्तीगीते, तसेच सायकल रॅलीचे (Cycle Rally) आयोजन करण्यात आले होते.
Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (Indepedence Day) अंतर्गत स्वराज्य महोत्सवामध्ये महापालिकेतर्फे 9 ऑगस्ट रोजी मुख्यालय राजीव गांधी भवन इथं विविध कार्य़क्रम आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC Commissioner) यांच्या सुचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे आणि अशोक आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे जोरदार आयोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिक मनपामध्ये ढोल वादन, देशभक्तीगीते, तसेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
शिवताल ढोल-ताशा पथकाने आपली कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. अतिशय लयबद्ध आणि जोशपूर्ण सादरणीकरणामुळे पथकातील सदस्यांना मोठी दाद मिळाली. एसव्हीकेटी, एचपीटी, बीवायके या महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनेही देशभक्तीपर विविध गाणी सादर केली. त्यातून देशभक्तीची लहर उमटली. महापालिकेचे कार्यकारी अभियंता रवी बागूल आणि कर्मचारी गुणवंत वाघ यांनीही देशभक्तीपर गीते सादर केली.या कार्यक्रमानंतर अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या सायकल रॅलीला आणि थार रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.
नाशिक महापालिका मुख्यालयापासून सायकल रॅलीला सुरुवात झाली. कॅनडा कॉर्नर, शरणपूर पोलिस चौकी, मायको सर्कल अशा मार्गाने पुढे गोल्फ क्लबला सायकल रॅलीचा समारोप झाला. ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी 75 सायकलिस्टने रॅलीत सहभाग घेतला होता. सायकल रॅलीच्या पाठोपाठ जिपची थार रॅलीही निघाली. टॉर्क आरपीएम 15 आणि ग्रेप सिटी ऑफ रोड या ग्रुपने थार रॅलीत सहभाग घेतला होता. लायन्स क्लब नाशिक मेट्रोचे पदाधिकारी, शिवताल ढोल-ताशा पथकाचे नारायण जाधव, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, थार रॅलीत सहभागी ग्रुपचे हर्षद कडभाने तसेच सुभेदार हरीश वानिया, सुभेदार चैनसिंह राजपुरोहीत या सर्वांचा सत्कार महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश खाडे आणि अशोक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. मनपाचे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते. सेवासाधना फाऊंडेशनचे दीपक भगत, राम कदम, रुपेश पाटील, कल्पेश खाडे हे देखील यावेळी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त महापालिकेच्या मुख्य इमारतीला विद्युत रोषणाई आणि मुख्य दरवाजाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नववर्ष स्वागत समितीच्या सदस्यांनी काढलेल्या विविधरंगी आकर्षक रांगोळीने मनपा मुख्यालयाचं सौंदर्य आणखीन खुललं आहे. ध्वजस्तंभ आणि परीसरही फुलांनी सजवला आहे. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या माहितीचे फलकही संपूर्ण शहरामध्ये लावण्यात आले आहेत. एलईडी स्क्रिनवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे.