Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सुंदर गाव पिंपळगाव बसवंत, काय आहे पिंपळगाव बसवंत पॅटर्न!
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा परिषद (Nashik ZP) अंतर्गत पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
Nashik News : 'आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव" योजनेत नाशिक (Nashik) जिल्हा परिषद (Nashik ZP) अंतर्गत सन 2021-22 या वर्षा करीता पिंपळगांव बसवंत (Pimpalgoan Baswant) ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार व 15 ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते आणि विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Officer), जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (CEO Leena Bansod), प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रदान करण्यात आले.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे रुपांतर स्मार्ट ग्राम योजनेमध्ये करण्यात आले होते व शासन निर्णय दि. 20 मार्च 2020 नुसार स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव योजना असे नामकरण करण्यात आले आहे. यात स्वच्छता, ग्रामपंचायत व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या घटकांच्या आधारे गुणांकन करुन त्यानुसार तालुकास्तरावर प्रथम सुंदर ग्रामपंचायत निवडली जाते व तालुक्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींमधून जिल्हास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत निवडली जाते. यात तालुकास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीस रक्कम रु. 10 लक्ष व जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीस रक्कम रु. 40 लक्ष बक्षीस म्हणून दिली जाते.
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगांव बसवंत (निफाड), माळेगांव (सिन्नर), सायगांव (येवला), रातीर (बागलाण), श्रीरामनगर (नांदगांव), कोल्हेर (दिंडोरी), मुंगसरे (नाशिक), निळगव्हाण (मालेगांव), हिरापूर (चांदवड), हातरुंडी (सुरगाणा), खालप (देवळा), नांदुरी (कळवण), काचुली (त्र्यंबकेश्वर), मोडाळे (इगतपुरी) व शेवखंडी (पेठ) या ग्रामपंचायतीना तालुक्यात सर्वात जास्त गुणांकन प्राप्त झाले आहे व त्यामुळे त्यांना तालुकास्तरीय सुंदर गांव घोषित करण्यात आले होते. या ग्रामपंचायतीमधून पिंपळगांव बसवंत (निफाड) या ग्रामपंचायतीस सर्वाधिक गुणांकन प्राप्त झाल्याने जिल्हास्तरीय सुंदर गांव म्हणून घोषित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सुंदर ग्रामपंचायती
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश कडाळे व ग्राम विकास अधिकारी लिंगराज जंगम, माळेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रिया सांगळे व ग्राम विकास अधिकारी कैलास वाघचौरे, सायगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच रुपाली उशीर व ग्रामसेवक प्रदीप बोडके, रातीर ग्रामपंचायतीच्या सरपंच ललिता आहिरे व ग्रामसेविका स्वाती देवरे, श्रीरामनगर ग्रामपंचायतीचे प्रशासक विजयकुमार ढवळे व ग्रामसेवक अतुल सोनवणे, कोल्हेर ग्रामपंचायतीच्या सरपंच नयना भरसट व ग्रामसेवक सोमनाथ ढोकरे, मुंगसरे ग्रामपंचायतीचे सरपंच रामदास उगले व ग्रामसेविका प्रतिभा घुगे, निळगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिल सकट व ग्रामसेविका सरला पगार, हिरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रंगनाथ थोरात व ग्रामसेविका आम्रपाली देसाई, हातरुंडी ग्रामपंचायतीचे प्रशासक गौरव हिरे व ग्रामसेवक मोहन गायकवाड, खालप ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा सूर्यवंशी व ग्रामसेवक सुदर्शन बच्छाव, नांदूरी ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष राऊत व ग्रामसेवक पंडीत महाजन, काचुलीं ग्रामपंचातयीचे प्रशासक बाळू पवार व ग्रामसेवक सचिन धूम, मोडाळे ग्रामपंचायतच्या सरपंच मंगलाबाई बोंबले व ग्रामसेवक नानाभाऊ खांडेकर आणि शेवखंडी ग्रामपंचायतीच्या प्रशासक भारती कळंबे व ग्रामसेवक दुर्गादास बोसारे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
पिंपळगाव बसवंत पॅटर्न
पिंपळगांव बसवंत येथे गावात उद्यान, पिंक सिटी, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ओझोन पार्क, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभिकरण, सांडपाण्याचा पाण्याचा पुनर्वापर, गावातील पुरातन वृक्षांचे जतन व संवर्धन, गुगल मॅपवर वृक्ष नोंदणी, प्लास्टिक येलिंग मशिनचा वापर, घनकचरा प्रकल्प, कचऱ्यापासून खत व वीजनिर्मिती असे अभिनव उपक्रम राबविण्यात आलेले आहेत व त्यामुळे पिंपळगांव बसवंत या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय सुंदर ग्रामपंचायत म्हणून निवड करण्यात आली, असे ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.