Nashik NCP Agitaton : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन, 'उज्वलां'चा स्वयंपाक पुन्हा चुलीवर!
Nashik NCP Agitaton : नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना चूल आणि लाकडे देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.
Nashik NCP Agitaton : गेल्या काही दिवसांपासून महागाई उच्चांक गाठत असून यामुळं सर्वसामान्यांचे हाल होत असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. यावेळी उपस्थित उज्वलांना चूल व लाकूड भेट देत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना महागाईने होरपळून निघालेल्या जनेतेला आता मोदी सरकार दिवसेंदिवस दणका देत आहे. या वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात आंदोलन करून सर्वसामान्य महिलांना चूल व लाकडे भेट देऊन उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरसह इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहेत. यातच या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली असून सर्वसामान्यांना मोदी सरकार झटका देत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळा सोसाव्या लागत असून गृहिणीचे घरातील बजेट कोलमडले आहे.
कोरोना महामारीतून जीवन पूर्वपदावर येत असतानाच महागाईने कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात दरवाढ होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहे. मे महिन्यातच घरगुती गॅस सिलेंडर सह व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर दोनदा वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे खाणेपिणे महाग झाले आहे.
दोन वर्षापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या आजारातून सर्वसामान्य जनता सावरत असताना महागाई मुळे जीव देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्र सरकार इंधनाची घोडदौड थांबविण्यास असफल ठरत असल्याने बाजारात CNG वाहनाचा वापर वाढला. परंतु त्याचेही दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने वाहनचालक त्रस्त होत आहे. “बहोत हो गई महंगाई की मार, अब बस कर यार !” असे बोलण्याची वेळ पंतप्रधानानी सर्वांवर आणली आहे. पंतप्रधानानी गरिबी रेषेखालील महिलांकरिता उज्वल योजनेद्वारे गॅस सिलेंडर देण्याची सक्ती केली. परंतु सध्याची स्थिती बघता त्यांना पुन्हा चूल पेटविण्याची वेळ आली असल्याने आम्ही पुन्हा सर्वसामान्य महिलांना चूल भेट देत आहोत.
घरगुती गॅस महागला!
सर्वसामान्याना लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तुमधील गॅसही महागला असून गृहिणींचे महिन्याचे नियोजन कोलमडले आहे. काही दिवसांपूर्वीच घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसचे (LPG Gas Price Hike) दर वाढवण्यात आले होते. 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले होते. 50 रुपयांची दरवाढ झाल्यानं आता सिलेंडरची किंमत 1003 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा महिला गॅसकडून चुलीकडे वळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.