Nashik APMC Election : नाशिकमध्ये मतदार थेट फाईव्ह स्टार हॉटेलात, प्रतिस्पर्धी पॅनलची चौकशीची मागणी
Nashik APMC Election : नाशिक बाजार समिती निवडणूकित एका पॅनलकडून मतदारांना थेट फाईव्ह स्टार हॉटलमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.
Nashik APMC Election : नाशिक बाजार समिती निवडणूक (Nashik Bajar Samiti Election) पहिल्या पासून चुरशीची राहत आली असून आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देविदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे (Shiwaji Chumbhle) या दोन नेत्यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. अशातच एका पॅनलकडून मतदारांना थेट फाईव्ह स्टार हॉटलमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी पॅनलकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची (APMC election) निवडणुक चुरशीची होत आहे. शेतकरी पॅनल आणि आपलं पॅनल असे दोन पॅनल या निवडणुकीत समोरासमोर असून पहिल्या दिवसांपासून अनेक प्रकरणामुळे ही निवडणूक गाजत आहे. अशातच शेतकरी पॅनलकडून मतदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. येथून मतदारांना मतदान केंद्रावर बसेसद्वारे सोडण्यात येत आहे. यावर प्रतिस्पर्धी पॅनलकडून आरोप करण्यात येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि आपलं पॅनलच्या देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी केली आहे. आदिवासी भागातील मतदार पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून एक दिवसाचे अकरा हजार रुमचे, जेवणाचे वेगळे खर्च करेल का? असा सवाल करत लूटमार करत गोळा केलेल्या पैशातून शेतकरी पॅनलने या मतदारांचा खर्च केल्याचा आरोप पिंगळे यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर देविदास पिंगळे म्हणाले कि, 30 वर्ष या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इलेक्शन करत असून अशी परिस्थिती ही पहिल्यांदाच पाहायला मिळते आहे. गेल्या इन दिवसांपासून मतदारांना फाईव्ह स्टारमध्ये नेऊन ठेवलेले आहे. अशा या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येमध्ये एका रूमची किंमत जवळपास 11 ते 12 हजार रुपये घेतले जातात. एका दिवसाचा जेवणाचा खर्च पकडून एका मतदारावर 25 ते 30 हजार रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप देविदास पिंगळे यांनी केला आहे. मागील 28 महिने संधी मिळाल्यानंतर शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी संस्था ओरबाडून घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून चौकशी सुरु आहे.
देविदास पिंगळे पुढे म्हणाले कि, सुरवातीला संस्थेची वार्षिक उलाढाल हि पंधरा लाख रुपये होती, मात्र आजमितीला 1800 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असल्याचे पिंगळे म्हणाले. नाशिक बाजार समिती क्षेत्र हे त्र्यंबक तालुक्यापर्यंत पोहचले आहे. येथील आदिवासी मंडळीला त्र्यंबक तालुक्यातून घेऊन आले आहेत. त्या लोकांना फाईव्ह स्टारमध्ये ठेवण्यात आले आहे. एकूणच भयानक प्रकार असून हा सगळा पैसा संस्थेचा वापरला जात आहे. मात्र आपलं पॅनल हे जनसामान्यांचे पॅनल असून सामान्य माणसांमध्ये नेहमी फिरणारा मतदार आपलं पॅनलला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पिंगळे यांनी व्यक्त केला.