(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard : चक्क नारळाच्या झाडावर बिबट्यांची लपाछपी, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
Nashik Leopard : नाशिकच्या (Nashik) सिन्नर (Sinnar) परिसरात चक्क नारळाच्या झाडावर बिबट्या (Leopard) खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Nashik Leopard : नाशिक (Nashik) शहर असो कि नाशिक जिल्ह्यातील निफाड (Niphad), सिन्नर (Sinnar) आदी परिसर असो. येथील नागरिकांना बिबट्याचे दिसणे नवे नाही. दिवसांतून चारदा बिबट्याचे दर्शन होत आहे. तर नाशिक शहरात अनेक भागात बिबटयाचा (leopard) मुक्त संचार नागरिकांना दिसून येतो. अशातच बिबट्या प्रवण क्षेत्र असलेल्या सिन्नर परिसरात चक्क नारळाच्या झाडावर बिबट्या खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नाशिक शहर परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. दरररोज शहर परिसरात किंवा जिल्ह्यातील बिबट्या प्रवण क्षेत्र असलेल्या भागात हमखास बिबट्याचे दर्शन होते. दरम्यान आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या व्हिडिओने खळबळ उडाली. सिन्नर तालुक्यातील सांगवी गावातील शांताराम घुमरे यांच्या शेताजवळ झाडावरती दोन बिबटे दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांनतर वनविभाग सतर्क झालं असून सध्या या व्हिडिओचा तपास सुरू आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या सांगवी येथील दिलीप कोंडाजी घुमरे, सुनील सखाहारी घुमरे यांच्या घराशेजारी व शांताराम विठोबा घुमरे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावरती चढताना दोन बिबटे आढळून आले आहेत. प्रत्यक्ष मोबाईलमध्ये विडिओ केलेला असून सध्या प्रचंड वायरल होतो आहे. यामध्ये पहिल्यांदा एक नंतर एक बिबट्या असे दोन बिबटे नारळाच्या झाडावर येजा करीत असल्याचे दिसून येत आहे. तर व्हिडिओसोबत स्थानिक गावकऱ्यांनी सदर परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील केली आहे. यासंदर्भात प्रशासन संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी करत आहे. त्यामुळे हा विडिओ सिन्नर तालुक्यातील आहे का? यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
व्हिडिओत काय दिसतंय?
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये म्हणजे नाशिक शहरातील किंवा ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रोज त्यांना किमान चार ते पाच बिबटे दिसून असून परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. सांगवी गावातील शांताराम विठोबा घुमरे यांच्या शेताजवळच नारळाच्या झाडावरती बिबटे नजरेस पडले आहेत. सुरुवातीला एक बिबट्या हा नारळाच्या झाडावरून खाली येण्याचा प्रयत्न करतोय. तो बिबट्या खाली येताच शेतात झाडाच्या खाली असलेला बिबट्या त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे वरती चढत असल्याचे दिसते आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मते परिसरात अजून चार बिबटे असून काही दिवसांपासून याबाबत तक्रारी करत आहोत. त्यामुळे वन विभागाने आता या बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, पिंजरा लावा अशी मागणी केली जात आहे.
दिवसातून चारदा दर्शन
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्याच्या तसेच दर्शनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नाशिक शहराजवळील विशेष म्हणजे नाशिक शहर परिसरात दिवसाला चारदा बिबट्याचे (Leopard) दर्शन होत असल्याने नाशिक हे बिबट्याचे माहेरघरच बनले आहे. त्यामुळे बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. त्यामुळे शहर परिसरात वाढत असलेला मानव बिबट संघर्षात नागरिकांनी देखील सजग असणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.