Nashik Savarkar Yatra : नाशिक वीर सावरकर यांची जन्मभूमी, आम्ही अपमान सहन करणार नाही, वीर सावरकर गौरव यात्रा
Nashik Savarkar Yatra : नाशिक जिल्हा सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला आहे.
Nashik Savarkar Yatra : नाशिक (Nashik) ही वीर सावरकर (Veer Savarkar) यांची जन्मभूमी असून नाशिक जिल्हा त्यांचा अपमान सहन करणार नाही, हा महाराष्ट्र देखील सहन करणार नाही, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला आहे. नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार (Bharati Pawar) आणि आमदार राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापले आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer sawarkar) त्यागाचे स्मरण करुन देण्यासाठी राज्यातील 288 मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा (Savarakar Gaurav Yatra) काढण्याचा संकल्प भाजपा आणि शिवसेनेने सोडला आहे. या पार्श्वभूमीवर सावरकर गौरव यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कालच नाशिकमध्ये भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रेला काढण्यात आली होती. त्यानंतर आज शहरात भाजप शहर कार्यकारिणीच्या वतीने भव्य सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग
नाशिक शहरातील भगूर (Bhagur) हे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे जन्मस्थान आहे. या जनस्थळी सावरकर यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे नाशिककरांना त्याचा अभिमान आहे. मात्र दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अपमान होत असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रभर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. आज सकाळी भाजपा कार्यालयापासून सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ झाला. यात नाशिकमधील अनेक नागरिकांसह महिला वर्गाने सहभाग घेतला.
यावेळी मंत्री भारती पवार म्हणाल्या की, "वीर सावरकर यांचा जन्म हा नाशिक शहरात झाला आहे, ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. स्वतःला भाग्यवान समजते की वीर सावरकरांचा जन्मभूमीत आपणही जन्म घेतला आहे. सावरकर यांनी मातृभूमीसाठी स्वतःचं बलिदान, स्वतःला समर्पण केले. मात्र त्यांचा आपमान केला जात असल्याने महाराष्ट्रामधून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे." राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत आहे. या यात्रेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पदाधिकारी, आमदार, खासदार, सर्वसामान्य जनता सहभागी झाली आहे.
अपमान सहन करणार नाही
"राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला आहे. त्याचबरोबर इतर काही नेत्यांकडून वीर सावरकर यांच्यावर अपमानजनक वक्तव्ये करण्यात आली. नाशिक ही वीर सावरकर यांची जन्मभूमी असून नाशिक जिल्हा अपमान सहन करणार नाही, हा महाराष्ट्र देखील सहन करणार नाही," असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला. नाशिक जिल्हा पेटून उठला असून आता जनताच विरोधकांना दाखवून देईल, असे खडेबोल भारती पवार यांनी सावरकर गौरव यात्रेतून विरोधकांना सुनावले आहेत.