Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचा फेरा, चार दिवस 'ऑरेंज अलर्ट'सह यलो अलर्ट
Nashik Rain Update : नाशिक (Nashik) जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळीचा फेरा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Nashik Rain Update : नाशिक (Nashik) जिल्ह्यात मागील महिन्यापासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) कहर केला असून आता पुन्हा अवकाळीचा फेरा नाशिक जिल्ह्यात येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने बळीराजाने सुटकेचा निःश्वास सोडला होता, मात्र पुन्हा एकदा अवकाळीचे ढग दाटून येणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यासाठी धोकादायक राहणार आहेत.
गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची दाणादाण उडवून दिली. आता राज्यात (Maharashtra) पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून (Weather Report) देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) मंगळवारी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) तर बुधवारी 'ऑरेंज' (Orange Alert) आणि पुढे शुक्रवारपर्यंत पुन्हा यलो अलर्ट दर्शवण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना तातडीने आदेशित करत उपाययोजना आणि विविध सूचना देण्याबाबत पत्र काढले आहे.
दरम्यान, गेल्या 1 मार्चपासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 50.1 मिमी इतका बेमोसमी पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली आहे. बेमोसमी पावसाने दीड महिन्यात अर्धशतक पूर्ण केले आहे. यंदा नाशिक जिल्हातील हजारो हेक्टर शेतपिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आर्थिक नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून आटोपले जात नाहीत; तोच पुन्हा दारावर संकट येऊन उभे राहिले आहे. 7 एप्रिल ते 16 एप्रिल यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून अलीकडेच पूर्ण केले गेले. अद्याप अंतिम पत्रदेखील सादर झालेले नाही, मात्र पुन्हा चार दिवस पावसाचे दर्शवण्यात आल्याने प्रशासनानेही धसका घेतला आहे.
शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन
दरम्यान पुढील चार दिवस पावसाचे असल्याने शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनांकडून आवाहन करण्यात आले आहे. या काळात विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पशुधन हे योग्य निवारागृहात व तसेच शेतकरी, शेतमजुरांनीही घरात आश्रय घ्यावा, उघड्यावर थांबू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून करण्यात आले आहे. वीज कोसळून यापूर्वीही जिल्ह्याच्या अनेक भागात अनुचित घटना घडल्या आहेत. या चार दिवसांमध्ये विजांचा लखलखाट जास्त तीव्रतेने होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील हजारो हेक्टर पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.