Nashik Padvidhar Election : नाशिक पदवीधरसाठी महाविकास आघाडीची नवी खेळी, नेमकं काय गणित जुळवलंय?
Nashik Padvidhar Election : नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत नवा ट्विस्ट समोर आला आहे.
Nashik Padvidhar Election : महाराष्ट्र शिक्षक सेनेने सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना विरोध दर्शविल्यानंतर आता पुन्हा अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्यजित तांबे यांना अडचणीत आणण्यासाठी आता थेट महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi) मैदानात उतरणार असून नाशिक पदवीधरसाठी वेगळी खेळी असल्याची माहिती समजते आहे.
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीसाठी (Nashik Padvidhar Election) पहिल्या दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत असून आता या ट्विस्टमध्ये महाविकास आघाडीने नवे ट्विस्ट उभे केले आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज महाविकास आघाडीने बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरविण्यात येणार आहे. शिवाय सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचे काय? या प्रश्नाची उकल देखील बैठकीत होणार असल्याचे समजते. मात्र महत्वाचे असे की, महाविकास आघाडी नागपूर आणि नाशिकच्या जागांमध्ये अदलाबदल करणार असून नागपूरच्या जागेवर काँग्रेस लढणार आहेत. तर नाशिकच्या जागेवरती काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी किंवा शिवसेना लढणार असल्याचे समजते आहे.
त्याचबरोबर शिवसेनेचा नागपूरमधील उमेदवार गंगाधर नाकाडे हा काँग्रेसचा उमेदवार म्हणून जाहीर करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे नाशिकच्या जागेवरती शुभांगी पाटील यांना शिवसेनेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडी पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर नागपूरमध्ये काँग्रेसची ताकद आहे तर नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. या सर्व बाबी पदवीधर निवडणुकीसाठी महत्वाच्या असल्याने महाविकास आघाडीकडून अशा प्रकारची खेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणीत भली मोठी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.
शुभांगी पाटील मातोश्रीवर....
नाशिक पदवीधर निवडणुकीत एका पाठोपाठ एक ट्विस्ट समोर येत असून अशातच अपक्ष उमेदवार म्हणून असलेल्या शुभांगी पाटील यांनी मुंबई गाठली असून त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतर मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेते सुभाष देसाई व नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. याच दरम्यान आता नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या देखील मुंबईत दाखल झाल्या आहेत.