Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
Nagpur News : विजय वडेट्टीवार यांना नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रकरणात उच्च न्यायालयाने ही नोटीस बजावून वडेट्टीवार यांना चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Nagpur News : काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रकरणात उच्च न्यायालयाने ही नोटीस बजावून वडेट्टीवार यांना चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. काँग्रेस उमेदवार वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय मिळवलाय. दरम्यान, त्यांच्याविरुद्ध स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट नारायण जांभुळे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
वडेट्टीवार यांनी नामनिर्देशक पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर जांभुळे यांनी आक्षेप घेतलेला आहे. शिवाय वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले तोच स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नी किरण यांनी स्वतः च्या नावे खरेदी केला होता. त्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाही, त्यामुळे स्टॅम्प कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे. असे जांभूळ यांनी याचिकेत दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता विजय वडेट्टीवारांना चार आठवड्यात उत्तर सादर करायचे आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकं काय होतं हे येणाऱ्या काळात कळू शकणार आहे.
....मात्र त्यात फारसं काही तथ्य नाही- विजय वडेट्टीवार
दुसरीकडे या मुद्द्यावर भाष्य करताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ती कायदेशीर कारवाई आहे. त्याचं उत्तर आपण न्यायालयात देऊ. यापूर्वीही नारायण जांभुळे यांनी माझ्या पत्नीच्या नावे स्टॅम्प पेपर होता असे म्हणत निवडणुकीचा फॉर्म भरला त्यावेळी या विषयी तक्रार केली होती. त्यावेळी ही ते हायकोर्टात गेले होते. मात्र हायकोर्टाने ती याचिका फेटाळली होती. दरम्यान तीच याचिका पुन्हा टाकली आहे. त्याचे उत्तर पुन्हा आम्ही देऊ. वकिलांचा सल्ला देऊन उत्तर देऊ. मात्र त्यात फारसं काही तथ्य नाही, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले
उदयनराजेंनी म्हटलं असेल तर सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा-विजय वडेट्टीवार
औरंगजेब कोण होता, कसा होता हे सगळ्यांना माहित आहे. ज्यांनी स्वतःच्या बाप, भावाला सोडलं नाही अशी प्रवृत्ती औरंगजेबची होती आणि त्याने सत्तेसाठी कुठलीही दयामाया दाखवली नाही. अशा क्रूर व्यक्तीच्या नावाला कोणी समर्थन देणार नाही. मात्र कबरेच्या संदर्भात जो निर्णय आहे तो पुरातत्त्व विभागाकडे ही कबर आहे. ते सरकारने योग्य निर्णय घ्यावा, ऐवढीच आमची भूमिका आहे.
औरंगजेबाच्या नावाखाली धर्मांधता पसरवणे, हिंदू-मुस्लिम वाद पसरवणे योग्य नाही. बहुतांश मुस्लिम हे शिवाजी महाराजांसोबत होते. औरंगजेब ही प्रवृत्ती होती, त्याला धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये. औरंगजेब धर्मवेडाच होता, त्याचा काळा इतिहासच आहे. अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रात आहे तर या संदर्भात उदयनराजेंनी म्हटलं असेल तर सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. औरंगजेबाची कबर उखडून टाकली पाहिजे या उदयनराजेंच्या वक्तव्यावर ते बोलत होते.
हे ही वाचा
























