Nashik Sinner : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धुळवड (Dhulvad Village) हे गाव टोमटो उत्पादक शेतकऱ्यांमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. आता पुन्हा हे गाव चर्चेत आले आहे. येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरपंच दादा सांगळे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काही दिवसांपूर्वी सिन्नर (Sinner) तालुक्यातील धुळवड येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी (Tomato Farmers) टोमॅटोतून लाखो रुपयांचं उत्पादन मिळाल्याने गावात बॅनरबाजी केली होती. ही अभिनंदनाची बॅनरबाजी चांगलीच चर्चेत आली होती. ही घटना ताजी असतानाच याच गावातील ग्रामपंचायतच्या शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्रामपंचायत (Grampanchayat) कार्यालयाच्या शेजारी असलेल्या किचन शेडमध्ये हा प्रकार घडला. सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात (Sinnar Hospital) शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. या प्रकारास सरपंच जबाबदार असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी करत त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 


दशरथ पांडुरंग जाधव असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. सकाळी ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या किचन शेडमध्ये छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत जाधव यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिक पोलीस पाटलामार्फत सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात दुपारी एक वाजता शवविच्छेदन आटोपल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. मात्र या आत्महत्येप्रकरणी सरपंच दादा सांगळे यांच्याकडे संशय दाखवत नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. उशिरानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत सरपंचाविरोधात गुन्हा दाखल केला. 


या प्रकरणी सरपंचास अटक 


दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर उशिरापर्यंत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. अखेर पोलिसांनी मृताची पत्नी संगिता जाधव यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्यांची तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला. नमूद केल्यानुसार मयत दशरथ जाधव हे आदिवासी भिल्ल समाजाचे असून त्यांना सरपंच दादा सांगळे यांनी फोनवरुन पाणीपुरवठ्याबाबत विचारणा करत जातीवाचक शिवीगाळ केली होती. हा राग मनात धरुन दशरथ जाधव यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले. सिन्नर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेत सरपंच सांगळे यांना अटक केली. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी धुळवड येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.


इतर संबंधित बातम्या : 


Nashik Tomato Farmer : सिन्नरचे शेतकरी टोमॅटोने लखपती झाले, मात्र संघर्षगाथाही तेवढीच मोठी, हा प्रवास सोपा नव्हता