Nashik Cyber Crime : नाशिक शहरासह जिल्ह्यात सोशल मीडिया (Social Media), इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक लूट, ब्लॅकमेलिंग, फसवणूक (Fraud) असे प्रकार नेहेमीच समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून सायबर दूत ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी शहरात जवळपास 1 हजार सायबर दुतांची (Cyber Police) निवड करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 महाविद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. 


सध्या राज्यात ऑनलाईन मार्गाने (Online Fraud) आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अर्थात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन तत्परतेने कार्यरत आहेत. या पार्श्भूमीवर राज्यभरात अनेक उपक्रम राबवले जात आहे. नाशिक शहराचे  (Nashik Police) पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सायबर गुन्ह्यांमध्ये होणाऱ्या वाढीची दखल घेत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. “सायबर दूत” हा उपक्रम सध्या नाशिक शहरात राबविला जात असून, सध्या हा उपक्रम दुसऱ्या टप्प्यात आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 27 महाविद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण देण्यात आलेले विद्यार्थी हे सायबर दूत म्हणून पोलिसांसोबत सायबर गुन्ह्यांची जनजागृती करत आहेत. ही जनजागृती विविध शाळा, महाविद्यालय, संस्था, कंपनी अशा ठिकाणी केली जात आहे.


दरम्यान इंटरनेट, मोबाईल, ऑनलाईन साधने या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामधील पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाची तयारी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात 500 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सायबर दूत या भूमिकेची अंमलबजावणी करण्यास तयार केले जाणार आहे. तब्बल 1000 विद्यार्थ्यांची सायबर दूत फौज तयार करण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यावर रोख घालण्यासाठी उपाययोजना या बाबत अधिकारी साक्षर करतात. प्रशिक्षण देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सायबर दुतचा अधिकृत बॅच देखील देण्यात येत आहे. 


या सायबर दुतांवर आपलं कॉलेज, राहता परिसर, तसेच समाजात सायबर गुन्ह्यांची जनजागृती करण्याची जबाबदारी आहे. नाशिक सायबर पोलीस ठाण्यातर्फे सायबरदुतांकरिता भविष्यात कॅप्सुल कोर्सेसचे आयोजन करण्यात येणार असून ‘सायबरदूत’ हा उपक्रम या पध्दतीचा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. गुन्ह्यांमध्ये दैनंदिन पातळीवर मोठे बदल होत आहे. वाढत्या सोशल मीडिया माध्यमांचा वापर, वाढते शहरीकरण, तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचे आकलन यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा वेळी जनजागृतीचे “सायबर दूत” यासारखे अनोखे उपक्रम नागरिकांमध्ये विश्वास आणि संरक्षण याची भावना अधिक बळकट बनवण्यास उपयुक्त ठरतात.


अशा प्रकारे लुटीचे प्रकार 


ओटीपी व लिंकच्या माध्यमातून बँक खात्यातील पैसे लुटणे, महावितरण बिल भरण्याचे नावाने तगादा लावत साईट ओपन करण्याच्या पाहण्याने मोबाईल हॅक करून बँक खात्यातील पैसे लुटले. इंस्टाग्राम, फेसबुक हॅक करून संदेश पाठवून पैसे उकळणे, अश्लील संदेश व व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करणे, महिलेचे नावे हनी ट्रॅप करत ब्लॅकमेल करत आर्थिक लूट करणे, विविध ऑफर लिंक पाठवून बँक खात्यातील पैसे लुटणे, अशा विविध प्रकारे सायबर गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Cyber Crime : सायबर दूत व्हायचंय, सायबर क्राईमला रोखण्यासाठी नाशिक पोलिसांचा अनोखा उपक्रम