Sinner News : सिन्नर (Sinner) तालुक्यात एकाच आठवड्यात दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी एका महिलेचा तर आज एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी आणि डुबेरे येथील या दोघांचे दुर्दैवी निधन झाले आहे. 


सध्या पावसाळ्याचे (Rainy Season) दिवस असून अनेकदा शेतीकामात, घरकामात असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागण्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्क राहून काळजी घेणे महत्वाचे आहे. मात्र थोडे दुर्लक्ष झाल्यास अनुचित प्रकार घडत असतात. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दोन गावात एकाच आठवड्यात विजेच्या धक्क्याने दोघांना जीव (Death) गमवावा लागला आहे. सुळेवाडी येथील महिला सत्यभामा रामकृष्ण गुंजाळ, तर डुबेरे येथील शेतकरी शरद कारभारी वामने यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान या दोन्ही घटनांमुळे स्थानिक गावकऱ्यांनी वीज वितरणला धारेवर धरत संताप व्यक्त केला आहे. 


सुळेवाडी येथील (Sulewadi) पहिल्या घटनेत गुंजाळ यांच्या घराजवळ असलेल्या विजेच्या खांबावरून घरासाठी वीज कनेक्शन (Light Connection) घेण्यात आले आहे. 28 जून रोजी दुपारनंतर परिसरात पावसाला सुरुवात झाली. गुंजाळ यांच्या घराजवळ असलेल्या लोखंडी खांबावर विद्युत प्रवाह उतरला. त्या खांबावरूनच गुंजाळ यांच्या घरात कनेक्शन देण्यात आलेल्या विजेच्या ताराला सपोर्ट देण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी तारेतून विद्युत प्रवाह घरात उतरला. घराला असलेल्या पत्र्याच्या कंपाऊंडमध्येही विद्युत प्रवाह उतरला होता. यावेळी सत्यभामा या कंपाऊंडजवळ गेल्या असता त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. जवळून जाणाऱ्या युवकांनी ग्रामस्थांना माहिती देत उपचारासाठी सिन्नरला खासगी रुग्णालयात (Sinner Hospital) हलवले. तेथून अधिक उपचारासाठी नाशिकला हलवीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.


शेतात असताना विजेचा धक्का 


डुबेरे येथील दुसऱ्या घटनेत शेतातील काम उरकून घराकडे जात असताना विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शरद कुटुंबासह शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतातील काम उरकल्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास ते घराकडे परतत होते. दोन-तीन दिवसांपासून पावसाची परिसरात रिपरिप सुरु असल्याने बांधावरून त्यांचा अचानक पाय सरकला. विजेच्या खांबासाठी असलेल्या तारेला त्यांच्या हाताचा स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने शरद जागेवरच बेशुद्ध झाले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने दवाखान्यात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


Santosh Munde Death : टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा मृत्यू, डीपीचा फ्यूज बसवताना विजेचा धक्का लागल्यानं अंत