Nashik Youth Dies : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिस दलात भरतीकरता सराव करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास धावण्याचा सराव करताना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन मृत्यू झाल्याची घटना सिन्नर (Sinner) तालुक्यातील मुसळगाव येथे काल पहाटेच्या सुमारास घडली. युवकाचे पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिलेच शिवाय कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


हल्ली कधी, कुणाला मृत्यू येईल सांगता येत नाही. कधी चालताना, कधी व्यायाम (Gym) करताना कधी पोहताना मृत्यू (Dies) होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. एकीकडे स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे असताना दुसरीकडे व्यायाम करतानाच मृत्यू होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार सिन्नरच्या भारत पोपट जाधव (Bharat Popat Jadhav) या तरुणासोबत घडला आहे. सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे अनेक तरुण पोलिस दलात भरतीची तयारी करत आहे. त्यासाठी ते दररोज पहाटे व सायंकाळी धावण्याचा सराव आणि व्यायाम करतात. यात भारत जाधव हाही पोलिस भरती होण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून दररोज पहाटे उठून आपल्या मित्रांसोबत धावण्याचा सराव करत होता. 


शुक्रवारी देखील नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसमवेत तो धावण्याचा सराव करत होता. पहाटेच्या सुमारास धावत अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने तो जमिनीवर कोसळला. यावेळी सोबतच्या मित्रांनी त्याला तत्काळ सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. भारतच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पोलीस भरतीसाठी तरुण तरुणी अहोरात्र मेहनत घेत असून पोलीस भरतीत धावणे हा प्रकार महत्वाचा असल्याने धावण्याचा सराव अधिकाधिक केला जातो. याच तयारीसाठी भारत जीवाचं रान करत होता. दररोज पहाटे उठून मित्रांसोबत धावण्यासह व्यायाम करत होता. मात्र काल पहाटेचा त्याचा धावताना हृदय विकाराचा झटका येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.. 


हल्ली अनेक जण शरीर सुदृढ राहावे यासाठी जिमला जाणे, धावणे, वेगवेगळे खेळ खेळणे, सायकलिंग, ट्रेकिंग अशा अॅक्टिव्हिटी करत असतात. हे चांगले ही आहे, मात्र हे करताना तुम्ही तुमच्या हृदयाची,शरीराची क्षमता जाऊन घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या जगणं बदललं आहे. दिनक्रम बदलला आहे आणि पोषणही बदललं आहे. त्यामुळे आपल्या क्षमता पारखूनच आहार, विहार आणि उपचार गरजेचा आहे, असं तज्ञ सांगतात. 


 


इतर महत्वाच्या बातम्या : 


स्विमिंग पूलमध्ये हृदयविकाराचा झटका; मालेगावमध्ये 19 वर्षीय युवकाचा मृत्यू, घटनेचं CCTV समोर