Nashik Crime : अनेक सरकारी अधिकाऱ्यांची बदली होताच नवीन ठिकाणी ते रुजू होत नाही, तोच आपल्या केबिनमधील टेबल, फर्निचर किंवा दरवाजाची ते दिशा बदलत असल्याचे बघायला मिळते. असे केल्याने सकारात्मक परिणाम बघायला मिळतील, अशी त्यांची यामागील भावना असते. मात्र नाशिकचे (Nashik) लाचखोर तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Nareshkumar Bahiram) यांच्याबाबतीत उलटच घडल्याचे पाहायला मिळाले.
नुकतंच अनेक दिवसांनंतर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक (Nashik ACB) विभागाच्या जाळ्यात नाशिकचा तहसीलदार अडकला. तब्बल 15 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या महसूल विभागासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. नरेशकुमार बहिरम यांची एप्रिल 2023 मध्ये नाशिक तहसील कार्यालयात तहसीलदार (Nashik Tahsildar) म्हणून नियुक्ती झाली होती. नियुक्ती होताच बहिरम यांनी आपल्या केबिनचे नुतनीकरण करत पश्चिमेकडे असलेल्या कॅबिनचे द्वार पूर्वेकडे करण्याचा निर्णय घेतला होता. महिनाभरापूर्वीच या कामाला सुरुवात झाली होती. खास बैठकींसाठी अँटी चेंबर, फर्निचर, रंगरंगोटी, पीओपीचे काम अंतिम टप्प्यात आले असून पश्चिमेकडील दाराची दिशा पूर्वेकडे करण्यात आली.
विशेष म्हणजे महसूल सप्ताह (Revenue Week) सुरु होताच दोन दिवसांपूर्वी बहिरम पहिल्यांदाच या नवीन केबिनमधील खुर्चीत बसले तर खरे मात्र त्यानंतर शनिवारीच ते एसीबीच्या जाळ्यात अडकले. एका गौण खनिज प्रकरणात तक्रारदाराला बजावण्यात आलेला सव्वाकोटी रुपयांचा दंड कमी करण्यासाठी 15 लाखांची लाच मागितली आणि राहत्या घरी पार्किंगमध्ये त्यांनी ती स्वीकारली होती. दरम्यान त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) नंतर बहिरम यांची नाशिकच्या तहसीलदारपदी नियुक्ती झाली. नाशिकचा पदभार हाती घेतल्यानंतर तहसील कार्यालयात नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. तहसीलदारांच्या दालनाच्या नुतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी कसा आणि कुणी मंजूर केला, याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच बहिरमला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना ताब्यात घेतल्याने सुसज्ज केबिनचे त्यांचं स्वप्नही भंगल्याचे बोलले जात आहे.
लाचेचं प्रकरण काय?
राजुर बहुला येथील जमीन मालकाला मुरुम उत्खननाबाबत पाचपट दंड व स्वामित्व धन मिळून एकूण सव्वा कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. या कारवाईविरूध्द तक्रारदाराने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. या अपीलावर फेरचौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरुम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालकाने नमूद केले होते. याची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम याने जमीन मालकाला स्थळ निरीक्षण करण्यासाठी बोलावले होते, मात्र प्रकृती ठीक नसल्याने जमीन मालकाने आपल्या वतीने कायदेशीर अधिकार पत्र देत एका विश्वासातील माणसाला त्यांनी पाठवले होते. संबंधित व्यक्ती तहसीलझार बहिरम यास भेटल्यानंतर कारवाईच्या तडजोडीअंती 15 लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती.
इतर संबंधित बातम्या :