Nashik Amhi Sawarkar : राज्यासह देशात स्वा. सावरकर (Veer Sawrakar) मुद्द्यावरून राजकारण तापलं असून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला इशारा दिल्यानंतर संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) याच मुद्द्यावरून शिंदे गटाने संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले असून बॅनर लावत राऊतांना खडे बोल सुनावले आहेत. 


राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा राज्यात सावरकर मुद्द्यावरून चांगलाच राजकारण पेटले आहे. त्यात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसला (Congress) सल्ला दिला. सोबत राहायचे असेल तर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा शब्दात इशाराही दिला. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत देखील सावरकर यांच्याविषयी अपशब्द खपवून घेतले नाहीत, असे सांगत इतरांनी आम्हाला सावरकर प्रेम शिकवू नये, असा सल्लाही दिला. दरम्यान आता याच मुद्द्यावरून नाशिकमध्ये शिंदे गटाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


नाशिकमध्ये ठाकरे शिंदे यांच्यातील शीतयुद्ध काही नवं नाही. रोजच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच राज्यात सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच आपल्याच पाहायला मिळत आहे. नाशिक मध्ये शिवसेना शिंदे गटाने रविवार कारंजा परिसरात शिवसेना शिंदे गटाकडून बॅनर लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये संजय राऊतांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाने 'आम्ही सारे सावरकर' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून बॅनरवर एका बाजूला काँग्रेस नेते मनी शंकर अय्यर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला बाळासाहेब ठाकरे जोड्याने मारत असल्याचे चित्र दाखविण्यात आले आहे. या चित्राखाली सावरकरांचा अपमान झाल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून निषेध केला होता, असं म्हटलं आहे. 


तर बॅनरवरील दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि राहुल गांधी यांचा गळ्यात गळा घालून काहीतरी कुजबुज चालल्याचे दिसत आहे. या चित्राखाली 'हेच खरे गद्दार ज्यांनी आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात, तेव्हा संजय राऊत हे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात' अशा आशयाची टीप यावर दिसत आहे. 


महाविकास आघाडीचे जहाज 


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात 'सावरकर गौरव यात्रा' ( Savarkar Gaurav Yatra) काढणार असल्याची घोषणा केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून  महाविकास आघाडीचं जहाजही हेलकावू लागलं होतं. मात्र महाविकास आघाडीचे कॅप्टन असलेल्या शरद पवार यांनी पुढाकार घेत जहाज बुडता बुडता वाचवलं. मात्र यानंतर राजकारण पाहायला मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.