Nashik Sinner News : हल्ली जिना चढत असताना, चालताना, एखादे काम करताना हृदयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने निधन झाल्याच्या घटना घडत आहेत. असाच एक प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील सोनांबे येथील 30 वर्षीय तरुणाच्या (Youth Died) पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात नेत असताना दुचाकीवरच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अलीकडे धावपळीचं जगणं झाल्याने कुठे कधी मृत्यू ओढवेल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चालता चालता, डान्स करताना, वाहन चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना सिन्नर (Sinnar) येथील तरुणासोबत घडली आहे. या तरुणास पोटदुखीचा त्रास होता. नातेवाईक दुचाकीवर दवाखान्यात घेऊन जात असताना अचानक तरुणास हृदयविकाराचा झटका आला अन् प्राण गमवावे लागले. सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील रहिवासी असून अमोल प्रकाश शिरसाठ असे या तरूणाचे नाव आहे.
सोनांबे येथे राहणारा अमोलला अचानक अस्वस्थ वाटू लागले. सायंकाळी अचानक अमोलच्या पोटात दुखू लागले. ही बाब त्याने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर काका व आई त्याला उपचारासाठी घेऊन दुचाकीवरून सिन्नरकडे येत होते. दुचाकीवर काका व आईच्या मधोमध अमोल बसला होता. घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सजवळ आल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला. काही वेळातच त्याने अंग सोडून दिले. पाठीमागे बसलेल्या आईने कसेबसे त्याला पकडून ठेवत सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात घेऊन आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासल्यावर मृत घोषित केले. काल रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोटात दुखत असल्याने अमोलला कुटुंबीय दवाखान्यात नेट असताना क्षणार्धात दुर्दैवी घटना घडली. काका व आईने अमोलला त्याच स्थितीत दवाखान्यात नेले. खासगी डॉक्टरांनी तपासणी करत त्याचे निधन झाल्याचे सांगितले. अमोल हा आईसोबत सोनांबे गावात राहत होता, तर माळेगाव येथील एका कारखान्यात तो नोकरीला होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून मित्र परिवारासह तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिन्नरच्या शिक्षकाचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी सिन्नर येथील शिक्षकाचा पर्यवेक्षण करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सिन्नर येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयात इयत्ता दहावीच्या पेपरचे पर्यवेक्षण करत असताना किरण भास्कर गवळी या शिक्षकांचा मृत्यू झाला होता. हे शिक्षक इंग्रजीच्या पेपरची तयारी करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी ते जमिनीवर कोसळले हे पाहून शाळेतील शिक्षकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तोपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता.