Nashik MVP Collage : मविप्रच्या नव्या कार्यकारणीकडून शरद पवारांची दिशाभूल, नीलिमा पवार यांचा दावा
Nashik MVP Collage : शरद पवार (Sharad Pawar) यांना संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा दावा माजी सरचिटणीस नीलिमा पवार (NIlima Pawar) यांनी केला आहे.
Nashik MVP Collage : मराठा विद्या प्रसारक समाज (MVP Education) शिक्षण संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून निवडणुकीत विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा दावा माजी सरचिटणीस नीलिमा पवार (NIlima Pawar) यांनी केला आहे. शिवाय आपण समोरासमोर बसून आर्थिक स्थितीबाबत चर्चा करू असे खुले आव्हानही पवार यांनी नव्या कार्यकारिणीला दिले आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यासाठी बहुचर्चित असलेली मविप्र संस्थेची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीत तब्बल वीस वर्षानंतर परिवर्तन पॅनलने मविप्र संस्थेवर नवी कार्यकारणी उभी केली. रविवारी परिवर्तन पॅनलच्या नव्या कार्यकारिणीने शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी कार्यकारिणीने संस्थेच्या लेखाजोखाबाबत चुकीची माहिती शरद पवारांना दिली असून संस्थेच्या आर्थिक आकडेवारीबाबत दिशाभूल केल्याचे खडे बोल नीलिमा पवार यांनी नव्या कार्यकारणीला सुनावले आहे.
नाशिकच्या मविप्र संस्थेची निवडणूक राज्यभर गाजली. त्यानंतर नूतन पदाधिकारी अनेकांच्या भेटीगाठी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर नूतन पदाधिकारी संचालकांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी संस्थेची प्रगती व आर्थिक परिस्थितीची माहिती देत मविप्र संस्थेवर 130 कोटींचे दायित्व असल्याचे सांगण्यात आले. याविषयीसमजल्यावर पवार यांनी चिंता व्यक्त करीत राष्ट्रवादीकडून एक कोटीची मदत देत तसेच पदाधिकारी विश्वस्तांनाही आर्थिक मदतीचे आवाहन केले. मात्र नूतन कार्यकारिणीने चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या आर्थिक परिस्थिती विषयी आपल्याशी समोर बसून चर्चा करावी असे खुले आव्हानही त्यांनी केले.
दरम्यान माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकार परिषद घेत नूतन कार्यकारिणीला चांगलेच सुनावले आहे. पवार यावेळी म्हणाल्या कि, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर संस्थेविषयी अतिशय चुकीची माहिती दिल्यामुळे संस्थेची राज्यात आणि प्रतिमा खराब झाली आहे. संस्थेचा ऑडिट अहवालाचे पदाधिकाऱ्यांनी नीट वाचन केल्यास त्यांच्याही लक्षात ही बाब येणार असून त्याकडे त्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. गेल्या बारा वर्षात आमच्या काळात संस्थेने 60 इमारती उभारल्या असून त्यासाठी 294 कोटी 43 लाख रुपये खर्च करण्यात आले असून पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष या इमारतींना भेट देऊन खात्री करावी असेही आवाहन केले.
मविप्र संस्थेचा लेखाजोखा
नीलिमा पवार यांनी यावेळी मविप्र संस्थेचा लेखाजोखाच मांडला. मविप्र संस्थेची स्थावर व चलत अशी 653 कोटी 14 लाखांची मालमत्ता असून गुंतवणूक येणे , शिल्लक रक्कम, मुदत ठेवी पाहता 398 कोटी 79 लाखाच्या मूल्य असल्याचे सांगितले. तसेच कोविड काळातील रुग्णालयाच्या वापरापोटी संस्थेला राज्य सरकारकडून 25 कोटी रुपये येणे आहे. संस्थेवर फक्त 97 कोटी 4 लाखांची देणे असल्याचे सांगून येणाऱ्या काळात नवीन शैक्षणिक प्रवेशा पोटी मोठे शुल्क जमा होणार असून त्याचे नियोजन पदाधिकाऱ्यांनी करावे. संस्थेविषयी गैरसमज पसरविण्यात येत असून सभासदांनी त्यावर विचार करावा असे आवाहनही पवार यांनी केले.