Nashik Saptshrungi Gad : सप्तशृंगी देवी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, मंदिर आज दिवसभर खुले राहणार
Nashik Saptshrungi Gad : सप्तशृंगी देवी मंदिर नव वर्षानिमित्त भाविकांना दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार आहे.
Nashik Saptshrungi Gad : नाशिकचं (Nashik) नव्हे तर खान्देशासह (Khandesh) संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड (Saptshrungi Gad) येथील सप्तशृंगी माता मंदिर नव वर्षानिमित्त (New Year) भाविकांना दर्शनासाठी दिवसभर खुले राहणार आहे. भाविकांची वाढती गर्दी आणि विकेंड असल्याने सप्तशृंगी देवी प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
दोन वर्षांच्या कोरोना (Corona) महामारीनंतर यंदा मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. यंदा थर्टी फस्टला शनिवार आणि नवीन वर्ष रविवार सुरु होत असल्याने नाशिकसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी आहे. याच पार्श्वभूमीवर सप्तश्रुंगी देवी दर्शनासाठी मंदिर हे 24 तास खुले राहणार आहे. शिवाय नव्या वर्षाची सुरुवात अनेक भाविक सप्तशृंगगड येथे देवीच्या दर्शनाने करतात. त्यामुळे सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी हाेते. यावर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या वतीने देण्यात आली.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच नाशिककर सज्ज झाले असून सप्तशृंगी देवी दर्शनासाठी विविध राज्यातून येणाऱ्या भाविक - भक्तांसाठी श्री सप्तशृंगी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वस्त संस्थेमार्फत देण्यात आली आहे. कोरोना महामारीनंतर यंदा प्रथमच नववर्षाच्या सुरुवातीला सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचे 24 तास मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. गडावर येणाऱ्या हरेक भाविकाला सुलभ दर्शन घेता यावे यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र सर्व नियमांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त ॲड. दीपक पाटोदकर यांनी केले आहे.
नियमांचे पालन करा...
दरम्यान कोरोनाची धास्ती असल्याने काही दिवसांपूर्वीच सप्तश्रुंगी गडावर भाविकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुट्टयांमध्ये व नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या भाविकांना या नियमांचे पालन करावे लागणार आहे. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत, असते त्यासाठीच मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला असून त्याचे पालन केले जाणार आहे. भाविकांनी देखील गर्दीचा अंदाज लक्षात घेता दर्शनासाठी मंदिरात वेळ काढून भाविकांच्या सोयीसाठी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. भाविकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.