नाशिक : हल्ली समाजात प्रेम विवाह (Love Marriage) करणाऱ्या तरुण तरुणीचं प्रमाण वाढत चाललं आहे. देशभरात गाजत असलेल्या सीमा सचिनचं उदाहरण सर्वांसमोर आहेच. मात्र अनेकदा प्रेमविवाहातून दुर्दैवी घटना घडल्याचे प्रकार देखील समोर येत असतात. अशा प्रेमविवाहातून घडलेल्या दुदैवी घटनांमुळे त्याचा सर्वाधिक मनस्ताप संबंधितांच्या कुटुंबीयांना होत असतो. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने हा मनस्ताप टाळण्यासाठी एक अनोखा ठराव केला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड (Niphad) तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रेमविवाह (Love Affair) करायचा असेल तर आई-वडिलांची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय नोंदणी कार्यालयाने देखील परवानगी देऊ नये, असा ठराव नाशिक जिल्ह्यातील सायखेडा (Saykheda Village) ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे गावात यापुढे कुणाला प्रेमविवाह करायचा असेल तर नियोजित वधू-वराच्या आईवडिलांचे परवानगी पत्र अनिवार्य केले आहे. प्रेमविवाहात अट टाकणारे आणि त्यासंबंधी ठराव पारित करणारे सायखेडा ग्रामपंचायत बहुदा राज्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी याबाबतचे पंचायतीला पत्र दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान या ठरावानुसार आई-वडिलांचे परवानगीचे पत्र असेल तरच विवाहाची नोंद ग्रामपंचायती दप्तरी करण्यात येईल. त्यांनाच विवाह केल्याचा दाखला मिळेल असा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत करण्यात आला. सदर ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदा करुन आदर्श कुटुंब पद्धती अंमलात यावी, यासाठी आता सरपंच गणेश कातकाडे, सुधीर शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी प्रयत्न करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित मंत्री, अधिकारी यांचीदेखील भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहे. या ठरावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
टोकाचे पाऊल उचलतात म्हणून ठराव
दरम्यान सायखेडा ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश कातकाडे म्हणाले की, प्रेमविवाहामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सामाजिक मानहानी होत असल्याने आई-वडील टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी गरजेची असल्याचा ठराव संमत केला आहे. तसेच राज्यस्तरावर कायदा व्हावा, यासाठी लवकरच ग्रामपालिका प्रशासन मुख्यमंत्री तसेच संबधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत.
गुजरातमध्ये असा ठराव करण्याचा विचार
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी काही दिवसांपूर्वी मेहसाणातील पाटीदार समाजाच्या कार्यक्रमात सांगितले की, प्रेमविवाहात ही अट घालण्याच्या मागणीवर कायद्यात विचार केला जात आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की जर एखाद्या मुलाने आणि मुलीने प्रेमविवाह केला तर विवाह नोंदणीच्या वेळी त्यांना किमान एका पालकाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. यामुळे लव्ह जिहादलाही बऱ्याच अंशी आळा बसू शकतो, असा पाटीदार समाजाचे म्हणणे आहे.
इतर संबंधित बातमी :
आळंदीत लग्न करायचंय, मग ही अट पूर्ण करा; प्रेम विवाह अन आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची गोची