नाशिक : भूमीपूजन होऊन चार वर्षे उलटून गेले, कोट्यवधीचा निधीही मंजूर आहे, तरीही स्टेडियमचे काम पूर्ण होत नसल्याने वास्तूपूजन आणि चक्क बोकड बळी देण्याचा कारनामा माजी नगरसेविकेच्या पतीने केल्याचा प्रकार समोर आला आहे. अपेक्षेप्रमाणे अंनिसने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रखडलेल्या स्टेडियमच काम त्यावर बोकड बळीचा उतारा नाशिक (Nashik) शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.


एरवी एखादी वास्तू उभी राहिल्याननंतर तिचे वास्तूपूजन केले जाते. मात्र हे पूजन सुरू आहे, नाशिकच्या अंबड परिसरातील छत्रपती संभाजीनगर स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आणि पूजनासाठी बसलेले दुसरे तिसरे कोणी नाही तर शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण दराडे (Kiran Darade) आणि त्यांचे पती बाळा दराडे. दराडे केवळ वास्तू पूजनापर्यत थांबले नाहीत तर त्यांनी बळी देण्यासाठी बकरा ही आणला होता. त्यामुळे नाशिक शहरात हा चर्चेचा विषय झाला असून यावर अंनिसने आक्षेप घेत कारवाईचा इशारा दिला आहे. 


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते चार साडेचार वर्षांपूर्वी स्टेडियमच्या विकास कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्यासाठी 6 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. या अंतर्गत प्रेक्षक गॅलरी, बास्केटबॉल कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, खेळाडूंना वसतिगृह अशी विविध कामे होणार होती, मात्र कामात काही ना काही अडचणी आल्यानं अद्याप एकही काम पूर्ण झालं नाही. चार वर्षांपासून अर्धवट झालेले काम, बांधकाम साहित्य पडून असल्यानं बोकड बळी आणि पूजन केल्याने काम मार्गी लागेल असा सल्ला दराडेंना त्यांच्या हितचिंतकानी दिला आणि त्यांनी थेट पुजेचा घाट घातला. 


अंनिसकडून कारवाईचा इशारा 


ज्यांच्याकडून समाजात अंधश्रद्धा निर्मूलनसाठी (Adhashrdhha Nirmulan) कार्य होणे अपेक्षित आहे, त्यांनीच सार्वजनिक कामं होत नसल्याने बोकड बळी दिल्याची वार्ता अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळल्यानंतर अंनिसने यावर आक्षेप घेतला आहे. लोकप्रतिनिधीकडूनच अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून कायदेशीर कारवाईचा सूचक इशारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिला. दरम्यान स्टेडियमचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी या आधी दराडे यांनी आंदोलनही केले होते. मात्र आता केलेल्या कारनाम्यामुळे काम कधी पूर्ण होणार हे सांगता येत नसले तरी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता अधिक आहे. 


इतर संबंधित बातमी : 


Nashik News : तू येरे पावसा! दोन महिन्यांपासून नाशिकला पाऊस नाही, पावसासाठी शाळेनं थेट लगानची मॅचचं भरवली!