Beed News : एकमेकांवर प्रेम जडले, प्रेमाच्या आणाभाका घेत एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनी प्रेमविवाह करुन संसार थाटला. लग्न होऊन तीन महिन्याचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही दुर्दैवी घटना बीड (Beed) जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी इथे घडली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्या केली.
प्रेमाचं रुपांतर लग्नात, तीन महिन्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी इथल्या आदेश चौधरी याच्यावर प्रेम जडले होतं. याच प्रेमाचं रुपांतर तीन महिन्यांपूर्वी लग्नात झाले. एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेल्या या जोडप्याने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. पण काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले. सासू आणि पती वारंवार त्रास देऊ लागल्याने प्रेम कमी झाले. याच त्रासातून स्वत:ची सुटका करण्याचा निर्णय पायलने घेतला. पती अहमदनगरला तर सासू शेळ्या चारण्यासाठी गेली होती. हीच संधी साधत तिने नको आयुष्य म्हणत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आरोपी सासू आणि पतीला बेड्या
पायलचे मामा दत्तात्रय लेकुरवाळे (रा. कुसडगांव ता.जामखेड. जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंभोरा पोलीस ठाण्यात पती आदेश चौधरी, सासू अलका चौधरी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सासू आणि पतीला अटक करण्यात आली आहे.
लग्न मोडण्यासाठी मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
एकतर्फी प्रेमातून तरुणाने सोशल मीडियावर एका मुलीसोबतचे फोटो व्हायरल करुन तिचं लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केल्याची घटना बीडमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन थेट लातूर गाठत आरोपी तरुणाला ताब्यात घेतल्याने मुलीचं लग्न लागले. बीडच्या केज तालुक्यातील एका मुलीवर लातूर जिल्ह्यातील तरुण एकतर्फी प्रेम करत होता. तसेच केज तालुक्यात त्याचे नातेवाईक असल्याने तो चारचाकी गाडी घेऊन बीडला यायचा. यातूनच दोघांची ओळख झाली. त्यामुळे बोलणे वाढले. दोघांनीही सोबत काही फोटोही काढले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी या मुलीचे लग्न जुळले. तसेच 30 मे रोजी लग्नाची तारीख देखील ठरली. मात्र याबाबत लातूरच्या तरुणाला माहिती मिळाली आणि त्याने मुलीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच फोटोसोबत 'मिसिंग लव्ह' अशा ओळीही लिहिल्या.
हेही वाचा