Nashik Trimbakeshwer : 'हलक्या पावसाची सर, फेसाळणारे धबधबे, धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर' हे सगळं नाशिकपासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, पहिने परिसरात अनुभवयास मिळत आहे. नाशिक शहरात जरी पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे पर्यटकांना नाशिकचे 'कोकण' भुरळ घालू लागले आहे. 


नाशिक (Nashik) शहराला पावसाची (rain) प्रतीक्षा कायम असून त्र्यंबकेश्वर शहर परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाल्यापासूनच पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत. अंजनेरीसह त्र्यंबकेश्वर, पहिने (Pahine) भागात चहुबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहेत. हे धबधबे जणू या डोंगरकड्यांचा साज असल्याचे भासत आहेत. या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांमध्ये आकर्षण वाढले असून, नाशिकसह गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधील पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत. त्र्यंबकराजाच्या दर्शनानंतर येथून जवळच असलेल्या अंजनेरी, पहिने, त्र्यंबक परिसराला भेट देतात. त्यामुळे सध्या पावसाळी सहलीसाठी (Rainy trips) शनिवार रविवारी विकेंडला पर्यटकांची गर्दी होताना दिसते आहे.


त्र्यंबकेश्वरजवळील पहिने हे गेल्या काही वर्षांपासून निसर्ग सहलीसाठी (Nature Tours) ओळखले जात आहे. या मार्गावर असलेल्या घाटाच्या दुतर्फा असलेले सह्याद्रीचे डोंगर जणू धुक्यात हरवल्याचा भास पर्यटकांना होतो. पाऊसधारेचा वर्षाव अंगावर झेलत पर्यटक सेल्फीची हौस भागवताना दिसतात. पावसाळी सहलीचा आनंद घेताना आजूबाजूला विविध जातीचे वृक्ष, रानभाज्या, फुलं, रानफुलं हे सगळंच बहरल्याने निसर्गाला उधाण आल्याचे दिसत. त्यामुळे पर्यटकांना फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. दरम्यान पेगलवाडी, पहिने या आदिवासी गावातील गावकऱ्यांना पर्यटकांच्या सहलीमुळे काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होताना दिसतो.


हरसूल वाघेरा घाटही बहरला!


पावसाच्या आगमनाने हरसूल-वाघेरा घाटाला हिरवाईचे कोंदण लाभले आहे. हा घाट वाघेरा पाडा ते नाकेपाडापर्यंत आठ किलोमीटरचा असून वनौषधींसाठी हा घाट परिसर प्रसिद्ध आहे. मात्र हळूहळू दुर्लक्षित असलेला हा घाट पर्यटकांमुळे सौंदर्याला बाधा पोहोचत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका घाटात अधिक असल्याने पर्यटकांनी पावसाळी सहलीचा आनंद घाटात लुटताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या घाटात लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करणे दुर्घटनांना निमंत्रण देणारे ठरु शकते, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.


निसर्गाला ओरबाडू नका


त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, पहिने परिसरात शनिवार रविवारी पर्यटकांची गर्दी होते. मात्र पावसाळी सहलीदरम्यान अनेक पर्यटक निसर्गाचे नियम सर्रास पायदळी तुडवत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. पर्यटनस्थळांवर मद्यपान, नाचगाणे, वृक्षवेलींना ओरबाडणे जेवणानंतरचे खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक, रिकाम्या बाटल्या बसल्याजागी फेकून देणे, असे प्रकारही सर्रास पहायला मिळतात. निसर्गकृपेने बहरलेला आदिवासी भाग अशा हुल्लडबाज पर्यटकांमुळे कुरतडत चालला असून पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्गाला ओरबाडू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा : 


Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यास 2 ऑगस्टपर्यंत पावसाचा कोणताही अलर्ट नाही, नाशिककरांना अजून प्रतीक्षाच