Jitendra Bhave : आम आदमी पक्षाचे (AAP) नाशिकचे पदाधिकारी जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांना पक्षाने पुन्हा एकदा एक वर्षांसाठी निलंबित (Suspended) केले आहे. पक्षादेश नसताना पक्षशिस्तीचे उल्लंघन करत काही माध्यमांबद्दल अपशब्द वापरल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री नविंदर अहलुवालिया यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे भावे यांच्या निलंबनानंतर जिल्ह्यातून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. 


जितेंद्र भावे हे नाशिकचे (Nashik) आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत. यापूर्वी देखील अनेकदा चर्चेत आलेले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षातच भ्रष्टाचाराबद्दल बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने पक्षातील इतर सहकाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. जितेंद्र भावे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या फेसबुक लाइव्हच्या (facebok Live) माध्यमातून नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवत फेसबूक लाईव्ह केले होते. मात्र, पक्षशिस्त आणि माध्यमांशी पक्षाचे संबंध खराब होत असल्याचे सांगत भावे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 


या कारवाईबाबत बोलताना भावे म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेपासून मी 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षात काम करत आहे. माझ्या कुवतीप्रमाणे पक्षाचे काम करण्याचा प्रमाणिक प्रयत्न नेहमीच केला. त्याचबरोबर सामान्य नागरिकांचे विविध प्रश्न, सामाजिक विषय आणि भ्रष्टाचार या विषयांत शक्य तेथे खंबीरपणे भूमिका घेत संघर्ष केला. या सर्व कामात माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मोलाची साथ आणि पाठिंबा दिला आहे. गेल्या काळात आपमधील अंतर्गत राजकारण हे अतिशय वेगळ्या पातळीवर गेलेले आहे. याचाच परिपाक म्हणून गेल्यावेळीही माझे निलंबन झाले होते. नंतर सर्वांच्या मागणीमुळे केंद्रीय नेतृत्वाने पक्षात पुन्हा घेत निलंबन रद्द केले होते. 


त्यानंतरही मी पुन्हा माझे पक्षाचे काम जोरात सुरू ठेवले. परंतु, अचानक माझे पुन्हा एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी  एका प्रकरणावरून फेसबुक लाईव्ह करून भ्रष्टाचार व घोटाळा या विषयावर स्पष्ट व परखड मतप्रदर्शन केले, यामुळे माझे निलंबन झालेले आहे. मी निलंबनाच्या कारवाईचा नम्रपणे स्वीकार करतो. यापुढे काळात पक्षाचे कोणतेही काम करणार नाही. निलंबन केवळ माझे झाल्याने सहकाऱ्यांपैकी कुणीही पक्ष सोडू नये, पक्षविरोधी विधान करू नये, असे आवाहन जितेंद्र भावे यांनी केले आहे. 


कोण आहेत जितेंद्र भावे? 


जितेंद्र भावे हे नाशिकचे आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत. यापूर्वी भावे यांनी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केलं होतं. त्यावेळी ते चर्चेत आले होते. रुग्णालयात बिलाच्या मुद्द्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि जितेंद्र भावे यांनी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी अंगावरील कपडे काढून आंदोलन केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करत आहेत. तसेच अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे भावे यांनी समोर आणली आहेत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्या निलंबनामुळे कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे चित्र आहे. 


संबधित बातमी : 


Nashik : आपचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक; शिक्षणाधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप