(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : काय ती नदी, काय ती हिरवळ, काय ते प्रदूषण! नाशिकची गोदावरी पानवेलींच्या विळख्यात
Nashik News : नाशिक (Nashik) शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली गोदावरी (Godavari River) नदी दिवसेंदिवस प्रदूषणाच्या (Pollution) घट्ट विळख्यात सापडत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली गोदावरी (Godavari River) नदी दिवसेंदिवस प्रदूषणाच्या (Pollution) घट्ट विळख्यात सापडत आहे. शहरातील बापू पुलाजवळ गोदावरी नदीच्या प्रवाहावर पानवेलींनी कब्जा केल्याने नदी तर दिसतच नाही, मात्र क्रिकेटचे मैदान असल्याचा भास होतो आहे. शिवाय काय नदी, काय हिरवळ, काय प्रदूषण असा उपहासात्मक टोला पर्यावरण प्रेमींकडून लावण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते. त्र्यंबक शहरातून पुढे नाशिक शहरात दाखल होते. मात्र उगमापासून ते नाशिक शहराच्या हद्दीपर्यंत गोदावरीत प्रचंड प्रदूषित झाल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून या संदर्भात जनजागृती तथा गोदावरी कृती समितीच्या माध्यमातून गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी लढा दिला जात आहे. मात्र मोजके ठिकाण सोडले तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे.
गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चांगला चर्चेत आला आहे. त्यातच नाशिक शहरातून वाहणारी गोदावरी नदी ही सध्या पानवेलीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे तिचा श्वास कोंडला गेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र नदीचा प्रवाहावर पानवेली सातत्याने तयार होत आहेत. यासाठी मनपा प्रशासनाकडून वेळावेळी मशीनच्या साहाय्याने काढण्यातही येते. मात्र काही दिवसानंतर परिस्थिती सारखीच होते. काही दिवसांपूर्वी तर नाशिकरोड भागातील नदी प्रवाहात स्वात मनपा आयुक्त रमेश पवार यांनी पानवेली काढण्यास मदत केल्याचे दिसून आले.
एकूणच काय तर पावसाळा सुरु होत आहे, या पावसाळ्याच्या तोंडावर नदी प्रवाहात तयार झालेल्या पानवेली लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे. अक्षरं पानवेलीमुळे गोदाकाठच्या सहा ते सात गावांना पूर पाण्याचा धोका दरवर्षी संभवतो. शिवाय शहरातही पूर परिस्थिती निर्माण होते. गोदावरी नदीपात्रात सातत्याने वाढत असलेल्या व पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून येणार्या पानवेलींमुळे फरशी पुलाला अडकून मोठ्या प्रमाणात फुगवटा निर्माण होऊन परिसरातील गावांमध्ये व शेती पिकात पाणी साचते. नदीपात्रात पानवेलींचे प्रमाण वाढल्याने परिसरातील गावांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य वाढले असून, प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदीला मैदानाच रूप
नदीत साचणाऱ्या पानवेलीची नाशिक मनपा प्रशासनाने यांत्रिक बोटीची मदत घेतली जाते. सातत्याने हे पानवेली काढण्याचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी नदीतील पानवेली जैसे थे आहे. शहरातील बापू पुलाजवळ नदीच्या प्रवाहावर पानवेली साचल्याने जणूकाही क्रिकेटचे मैदानाचा असल्याचे भासत आहे. नदीचे पात्र पूर्णतः पानवेलींनी व्यापल्याने नदी आहे कि मैदान ओळखणे कठीण झाले आहे. तर काही पर्यावरण प्रेमींनी ट्रेंडिंग रिल्सद्वारे हि बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.
पानवेलीमुळे.....
पानवेली या संपूर्ण पात्रात पसरलेल्या आहेत, सध्या पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहू लागली किंवा पूर सदृश स्थिती निर्माण झाल्यास प्रवाहाला अडथळा ठरतात. त्यामुळे गोदाकाठावर असलेल्या शहर परिसरात, पुढे चांदोरी सायखेडा या गावांना पुराचा धोका वाढतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने पानवेली काढणे आवश्यक आहे.