Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अशोकस्तंभावरील जुना चांदवडकर वाडा दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील 1077 धोकादायक इमारती घरे मोडकळीस आल्याचं जाहीर करत जुने वाडे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या मिळकती रहिवासी किंवा मालकांनी त्वरित खाली कराव्यात, अन्यथा पोलिसांच्या मदतीने या इमारती रिकामे करून घ्या, असे आदेश नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Nashik NMC Commissioner) यांनी दिले आहेत


नाशिक शहरात अत्यंत प्राचीन वाड्यांचा (wada) वारसा पाहायला मिळतो. मात्र आता हे वाडे जीर्ण अवस्थेत आल्याने कधीही कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी मनपाकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक वाडे, घरे स्वतःहून उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या जातात. परंतु, यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच धोकादायक इमारती उतरवून घेण्याच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. तत्कालीन प्रशासक रमेश पवार यांनी गेल्या वर्षी मे महिन्यातच सर्वेक्षण करून 30 वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती घरे वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर धोकेदायक मिळकती रहिवाशांना प्रथम नोटीस देऊन सुरक्षित स्थळी हलवावे अशा सूचना केल्या. त्यास मिळकतदारांनी दाद न दिल्यामुळे दुसऱ्यांदा नोटीस व त्यानंतरही ऐकल्याने अखेरीस तिसरी व अंतिम नोटीस बजावली आहे. पवार यांच्या बदलीनंतर एकूणच कारवाई थंड झाली होती. चार दिवसांपूर्वी वाहनाच्या धडकेने अशोकस्तंभ येथील एक धोकादायक वाडा अचानक पडल्यानंतर पुन्हा प्रशासन कार्यतत्पर झाले आहे.


घरमालकानी भाडेकरूंनी धोकादायक इमारती घर वाडे स्ट्रक्चरल कन्सल्टसची मदत घेऊन उतरवून घ्यावेत. रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने कारवाई न केल्यास कायद्यानुसार पोलिसांमार्फत मोकळ्या करून घेतल्या जातील, अशा सूचना मनपा आयुक्त पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत. दरम्यान नाशिक शहरात सहा विभाग असून या सहाही विभागात जुने वाडे पाहायला मिळतात. यात पश्चिम विभाग 600, पंचवटी 198, पूर्व 117, नाशिकरोड 69, सातपूर 68, सिडको 25 असे एकूण 1077 वाडे धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे घरमालकांनी तातडीने खाली उतरवण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. 


नाशिक शहर परीसरात विशेषत: जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भाडेकरी व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आले असले तरी त्याबाबत कारवाई होत नाही, मात्र महापालिका आयुक्तांच्या भूमिकेमुळे शहरातील हा जुना तसेच गंभीर प्रश्‍न मार्गी लागणार आहे.