Nashik Peth Earthquake : तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे विनाशकारी रूप समोर आल्यानंतर भूकंपाचा सामना करण्यासाठी आपली कितपत तयारी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका गावात तब्बल 80 हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे संशोधनही झालं, पण कारणं अद्याप समोर आलेली नाहीत. प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याने मरणाची वाट बघत आहेत का? असा सवाल गावकऱ्यांनी संतप्त होत उपस्थित केला आहे. 


तुर्कीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले. ज्यात 30 हजाराहुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला, हजारो ईमारती जमिनोदस्त झाल्या आणि निसर्गाचा हा प्रकोप बघता साऱ्या जगानेच भूकंपाची धास्ती घेतलीय. दरम्यान असाच भूकंप जर आपल्याकडे झाला तर त्याचा सामना करण्यासाठी आपली कितपत तयारी आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत असतांनाच नाशिकच्या पेठ तालुक्यातील गोंदे गावी एबीपी माझाची टिम जाऊन पोहोचली. सह्याद्री डोंगर रांगांच्या कुशीत वसलेल्या आणि नाशिक शहरापासून जवळपास 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावी आजवर गेल्या 30 वर्षात भूकंपाचे एक दोन नाही तर तब्बल 80 हून अधिक धक्के बसले आहेत. गावातील नदीचा डोह कधीही आटत नव्हता. मात्र काही वर्षांपूर्वी भूकंपाचा हादरा बसला आणि त्यानंतर या डोहातील पाणीच गायब झाले, जमिनीला भेगा पडल्या, भल्या मोठ्या खडकांनाही तडे गेले तर अनेक झाडेही कोसळल्याचं गोंदे गावचे शेतकरी मोहन माळगावे सांगतात. 


यावेळी एबीपी माझाच्या प्रतिनिधी गावातील लोंकांशी संवाद साधत नेमकी परिस्थिती समजून घेतली. यावेळी मोहन माळगावे म्हणाले कि, 30 वर्षांपासून गोंदे मध्ये राहतो, हा डोह कधीच आटत नव्हता. पण 2000 साली तो आटला. सागाचे झाड चिरले. त्यानंतर तहसीलदार आणि शास्त्रज्ञ आले होते. हैद्राबाद वरून एक महिना होते, नळ्या ठोकायचे, जमिनीत गॅस काढायचे. आजवर खूप धक्के बसले, पहाटेला जास्त धक्के बसले, अमावास्येला किंवा पौर्णिमेला अधिक होते. कधी कधी खूप जोरात बसतात. लांबच्या गावांना पण हादरा बसतो, भांडे पडतात. दोन महिन्यांपूर्वी हादरा बसला होता, डोह आटला, खडकाची चाळणी झाली. चार दिवस डोहाचे पाणी खाली गेल्याचे ते म्हणाले. 



गोंदे हे भूकंपाचे केंद्रबिंदू ठरत असून आसपासच्या 5 किलोमीटर अंतरावरील जवळपास 32 गावांवर याचा परिणाम जाणवतो आहे. गोंदे शेजारीच असलेल्या भायगावची येथील लोकसंख्या अठराशे असून गावकऱ्यांमध्ये तुर्कीच्या भकुंपाचे विनाशकारी रूप बघून घबराटीचे वातावरण पसरले आहे. आजवर या गावाला भूकंपाचे नक्की किती हादरे बसले असतील, ते सुद्धा गावकरी सांगू शकत नाहीत. गावच्या पूर्वेला असलेल्या डोंगराचा एक भाग भूकंपामुळे खचला, गावात पाणी समस्या निर्माण झाली. आमची घरे कच्ची आहेत, गावात अनेक वेळा ना वीज असते. ना मोबाईलला नेटवर्क. भूकंप झाल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी येतात आणि फक्त समजूत काढून जातात, एखादी मोठी दुर्घटना होण्याची ते वाट बघतायत का ? असा संतप्त सवाल हे गावकरी उपस्थित करता आहेत. 


स्थानिक गावकरी म्हणाले कि, एक मोठा भूकंपाचा धक्का जाणवला, तेव्हा भायगावचा पूर्वेला असलेल्या डोंगराचा मातीचा काही भाग कमीत कमी 100 फूट खाली आला. भुसखलन झाले होते. शासनाने कुठलाही तपास केला नाही. हिवाळ्यात जास्त धक्के जाणवतात, शासनाकडे रिपोर्ट जातात. पण काही होत नाही. तुर्कस्तानसारखी वेळ आमच्या गावावर आली तर काय होईल, भविष्यात शासन याची दखल घेणार का? गोंदे पासून साधारणतः अडीच किलोमीटर अंतरावरील निरगुडे या गावची घरेही अशाच पद्धतीने मोडकळीस आली आहेत. भूकंपामुळे अनेक घरांना तडे गेले असून या गावात काही महिन्यांपूर्वी जमिनीतून आवाज येऊन पाण्याचे बुडबुडे देखील बाहेर पडत होते, याबाबत प्रशासनाचे अधिकारी तसेच भूगर्भ अभ्यासकांनी देखील संशोधन केले. मात्र नक्की कारण अद्यापही समोर आलेलं नाही. 


शासन बदलते, माणसे बदलतात. पण गाव आहे, तिथेच आहे...


बऱ्याचदा आम्ही घराच्या बाहेर पडलो आहे, कुत्रे भुंकतात. आपण शेकड्यात सुद्धा नाही, सांगू शकत एवढे धक्के आमच्या गावाला बसले आहेत. प्रशासन फक्त येते आणि जाते, त्यांना मोठ्या काही घटनेची अपेक्षा असेल असे वाटते. भूकंपामुळे इथे पाणी विस्कळीत झाले. मंदिर, घरे, शाळा यांना तडे पडले असून आम्ही ते रिपेअर केले. सध्या गावात पाणी टंचाई असून घरकुल योजनांसाठी चांगला निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा गावातील एकाने व्यक्त केली.  तर यावेळी ग्रामस्थांनी चर्चा केल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एकजण म्हणला की, हादरे बसल्यानंतर पूर्ण गावात घबराट तयार होते? पळायचे कुठे हा प्रश्न निर्माण होतो. आमचे घरे कमकुवत आहेत, धक्का बसल्यावर शाळांमध्ये जाण्यास सांगितले जाते, मात्र स्थलांतरित व्हायचे तर शाळाही कमकुवत आहेत. शासनाने घरे पक्के करून द्यावे. 1 लाख 35 हजारात घर होत नाही, चांगले घर दिले ते आम्ही वाचू शकतो. जेव्हा भूकंप होतो, तेव्हा लाईट नसते. त्यामुळे जायचे कुठे? सौर ऊर्जेचे लाईट भूकंपग्रस्त गावांना द्यावे. ईथे मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे भूकंप झाला तर प्रशासनाकडे फोन कसा करायचा? लाईटच्या तारा घरांवर आहे, पोल कमकुवत आहेत. अधिकारी येतात आणि म्हणतात घाबरू नका, काही होणार नाही. पण शेवटी मरायचे आम्हाला आहे, त्यांना नाही. ज्यावेळेस आम्ही मरू तेव्हा शासनाकडे करोडो रुपये असणार आहे. आम्हाला उकरायला जेसीबी लावतील, पण आज शासनाकडे पैसा नाही. तेव्हा राखीव निधी पण असेल. मेल्यानंतरचे पण 5-10 लाख रुपये कधी मिळतील, माहित नाही. कोणता विकास आहे, सांगा. शासन बदलते, माणसे बदलतात. पण गाव आहे, तिथेच आहे, ग्रामीण भागात कोणी लक्ष देत नसल्याची केविलवाणी खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली. 


आतापर्यंत 83 भूकंपाचे धक्के


साधारण 1993 पासून वारंवार धक्के बसत असून अधिकारी लोकप्रतिनिधी सगळ्यांना भेटलो आहे. भूकंपाचे केंद्रबिंदू पासून 5 किलोमीटर अंतरावर जवळपास 32 गावे आहेत, मोठी मानवहानी होऊ शकते. भविष्यात. एखादा दवाखाना, अम्बुलंस, मोबाईल सेवा अशाच बऱ्याच गोष्टीची मागणी केली होती. स्पेशल प्रायोरिटी मध्ये घरे द्या. घरे रिपेअर करून द्या, सरकारची मदत होत नाही. विलासराव देशमुखांच्या काळात प्रत्यक्ष त्यांना भेटलो होतो आश्वासना व्यतिरिक्त कधीच काही भेटले नाही. भूकंपामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे, टँकरने पाणी घ्यावे लागते. भविष्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचे म्हणाले. आतापर्यंत 83 भूकंपाचे धक्के बसले असून 3.7 रिश्टर सर्वात मोठा धक्का बसला होता. काही महिन्यांपूर्वी मशीन ठेवले पण नंतर ते ही घेऊन गेले. 100 टक्के आदिवासी भाग असल्याने दुर्लक्ष करताय का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. आपत्कालीन विभागाकडून म्हणा किंवा ईतर कुठलीच मदत, निधी नाही. भूकंप म्हणून काहीच होत नाही, आमच्या मरणाची वाट पाहत आहे का? प्रशासनाला सांगणेही बंद केले...वारंवार पाठपुरावा करत आहोत पण शासन दखल घेत नाही. तुर्कीमध्ये 30 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे जमिनोदस्त झाली. आता या घटनेनंतर या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने याची दखल घ्यावी अशीच मागणी ते करत आहेत.


पेठ तालुक्याचे तहसीलदार म्हणाले....


यावेळी पेठ तालुक्याचे तहसीलदार संदीप भोसले म्हणाले कि, गोंदे- भायगाव ईथे पूर्वीपासून सौम्य धक्के बसतात. वेळोवेळी याची नोंद मेरी भूकंप मापन केंद्रात होते. इथे बऱ्याच वेळा धक्के बसले असून सौम्य प्रकारचे असल्याने जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. अशावेळेस लोकांचे मनोधैर्य खचू नये, भीती वाटू नये म्हणून प्रशासनामार्फत तिथे जनजागृती केली जाते. मागे पावसाळ्यात जमिनीला भेगा पडल्या, बुडबुडे निघत होते. या अनुषंगाने विशेष टीम येऊन त्यांनी संशोधनाचा प्रयत्न केला. पण निश्चित कारण समजू शकलेले नाही. निश्चितच त्या ठिकाणी 80 पेक्षा जास्त धक्के बसले आहे, इतिहास पण आहे की इथे धक्के बसले.
  
दरम्यान ज्वालामुखीचा उद्रेक, मोठ्या धरणांचा जमिनीवर पडणारा ताण, सुरुंग किंवा जमिनीच्या आत केल्या जाणाऱ्या अनुचाचण्या या काही गोष्टी भूकंपाला कारणीभूत ठरत असल्याचं आजवर समोर आले आहे. मात्र पेठ तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीमागील नक्की कारण काय? हे अद्याप समोर आलेलं नाही. ईथे आजवर शास्त्रज्ञ येऊन गेले आहेत. त्यांनी अभ्यास केला आहे, मात्र नक्की कारण काय आहेत? त्यावर उपाययोजना काय? याची उत्तरं गावकऱ्यांना मिळू शकलेली नाहीत. काही शास्त्रज्ञांनी सीरिया, तुर्की नंतर भारतालाही भूकंपाचा झटका बसवण्याचे भाकीत वर्तवले असल्याने एखादी मोठी आपत्ती समोर येण्याआधीच पेठ मधील भूकंपाच्या या घटनांकडे महाराष्ट्र शासनाने अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे.