Nashik News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) येवला तालुक्यातील 17 वर्षीय मुलगी आरोग्य प्रशासनाच्या कुचकामी व्यवस्थेचा बळी ठरली आहे. येवला तालुक्यातील राजापूर येथील 17 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 


येवला (Yeola) तालुक्यातील राजापूर येथे 17 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या आई-वडिलांबरोबर शेतात काम करत असताना सर्पदंश (SnakeBite) झाला. या घटनेत विद्यार्थ्यांनी प्रगती हनुमान वाघ हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रगती ही विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. आई वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्याने ती नेहमी शेतातील कामांत मदत करत असे. शिवजयंती निमित्त काल सुट्टी असल्याने ती आई-वडिलांबरोबर शेतात काम करत होती. याचवेळी दुपारच्या सुमारास सापाने चावा घेतला. ही बाब प्रगतीच्या लक्षात येताच तिने त्याच परिस्थितीत राजापूर ग्रामीण रुग्णालय गाठले. मात्र याच वेळेस ती बेशुद्ध झाली. 


शिवाय ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकाच वेळेवर हजर नसल्याने तिला खाजगी वाहनांमध्ये येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार करण्यात येत असताना उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटेच्या वेळी सुमारास तिचे निधन झाले. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने येथील एका मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि ॲम्बुलन्स उपलब्ध झाली असती तर या मुलीचा जीव वाचला असता अशा प्रतिक्रिया अंत्यसंस्काराचे वेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तीन-चार वेळेला राजापूर गावात विविध घटना घडवून ॲम्बुलन्स उपलब्धच होत नाही. त्यामुळे या अंबुलन्स चालकाला कार्यमुक्त करण्यात यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. गैरहजर असलेल्या डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख अण्णा मुंडे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे यांनी केली आहे. लाखो रुपये खर्च करून गरिबांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. मात्र या ठिकाणी ग्रामस्थांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराज व्यक्त होत आहे. 


या प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी भेट दिली असता येथील सावळागोंधळ पाहून त्यानी यात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही कर्मचाऱ्यांमध्ये काही सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे हकनाक एक जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथे तीन आरोग्य कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात आलेले आहे. परंतु काही काम अपुर्ण अवस्थेत असल्याने या ठिकाणी राहता येणे शक्य नसल्याने कर्मचारी वर्ग राहत नाही. याबाबत संबंधितांना अनेक वेळा सांगितले असून अद्याप दखल घेतली नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी दिली आहे.