Nashik Chhagan Bhujbal : नाशिकच्या (Nashik) पदवीधर निवडणुकीत ज्या काही घडामोडी घडल्या त्या अनपेक्षित होत्या. कोणत्याही उमेदवाराला एबी फॉर्म (AB Form) दिल्यानंतर तपासणे महत्वाचे असते, सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी देखील काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिल्यानंतर ते तपासणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नसल्याने सत्यजित तांबे यांनी आरोप केले असावेत असे मत छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले आहे. 


नाशिक (Nashik) पदवीधर निवडणूक झाली असली तरीही अद्याप या निवडणुकीत ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी घडल्या. त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद यामुळे चव्हाट्यावर आला आहे. अशातच ज्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं याविषयी सविस्तर मांडणी केली, त्यावरून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली. तसेच जाणीवपूर्वक भलत्याच मतदारसंघाचे एबी फॉर्म आणून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी पटोले यांची पाठराखण केली.


छगन भुजबळ म्हणाले की, विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्यावेळी जे काही घडले ते वेगळेच होते. मात्र, काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिल्यानंतर सहसा कोणी त्यावरील मतदारसंघ क्रमांक, प्रवर्ग न तपासता तो ताब्यात घेईल असे वाटत नाही. त्यामुळे आमदार सत्यजित तांबे यांच्या आरोपांविषयी शंका वाटते. कदाचित काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठीच त्यांनी आरोप केले असावेत, असे मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.


एबी फॉर्म तपासणे महत्वाचे होते... 


पदवीधर मतदारसंघात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे काम चांगले असल्याने त्यांना निवडून देऊ असे आपण नाशिकमध्ये सांगितले देखील होते. मात्र, ऐनवेळी बऱ्याच घडामोडी घडल्या. सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात आरोप केले ते म्हणाले की असले तरी अशाप्रकारे वेगळ्या मतदारसंघाचे एबी फॉर्म असेल तरी ते तपासल्याशिवाय कोणी स्वीकारते काय असा प्रश्न त्यांनी केला. पटोले यासंदर्भात उत्तर देतीलच. मात्र, बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीच याबाबत सत्यकथन करावे, असे ते म्हणाले. सत्यजित तांबे यांनी थेट पक्षावर केलेले आरोप बघता ते पक्षात राहण्यास उत्सुक नाहीत, असेही भुजबळ म्हणाले. तांबे यांची अगोदरपासून तयारी होती. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी ऐनवेळी उमेदवारी करूनही चांगली मते मिळवली, असेही ते म्हणाले.