Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सावकारीचं (Money Lenders) मोठं जाळं पसरलं आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून काही दिवसांपूर्वीच एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली होती. यातच आता सावकाराच्या जाचाला कंटाळून नाशिकमधील एकलहरे गावातल्या (Eklahare Village) दोन भावांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये रविंद्रनाथ कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर जगन्नाथ कांबळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, कांबळे कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. काल काही वेळ नाशिक-पुणे महामार्गावर रास्तारोकोही करण्यात आला होता. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. 


काल संध्याकाळच्या सुमारास नाशकातील एकलहरे गावात रविंद्र लक्ष्मण कांबळे आणि त्यांचा भाऊ जगन्नाथ लक्ष्मण कांबळे या दोघांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान रविंद्र लक्ष्मण कांबळे यांचा मृत्यू झाला असून जगन्नाथ लक्ष्मण कांबळे यांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. ज्यावेळी दोघांनी आत्महत्या केली, त्यावेळी दोघांजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत सावकाराच्या जाचाला कंटाळून आम्ही हे पाऊल उचलल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी रविंद्र लक्ष्मण कांबळे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच, काही काळासाठी नातेवाईकांकडून रास्तारोकोही करण्यात आला होता. 


पाहा व्हिडीओ : Nashik : नाशकात सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन भावांनी संपवलं जीवन



दोन्ही भावांनी आत्महत्या केल्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी केली. पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख होता. त्यानंतर पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. 


दरम्यान, गेल्याच आठवड्या सातपूरला वडील आणि दोन मुलांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. आता आठवडाभरातच सावकाराच्या जाचालाच कंटाळून केलेलं आणखी एक आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Nashik News : टोकाचं पाऊल का उचललं जातंय? नाशिकमध्ये 17 वर्षीय मुलीसह चौघांनी जीवन संपवलं!