Nashik Staff Strike : नाशिकमधून हजारो कर्मचारी संपावर, तर मनपातील कर्मचारी कामावर, काय आहे परिस्थिती?
Nashik Staff Strike : राज्य सरकारी कर्मचारी (State Employees) आजपासून बेमुदत मुदत संपावर (Protest) गेले आहेत.
Nashik Staff Strike : जुनी पेन्शन योजना (Old Pension) लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी आज राज्यभरातील विविध 60 विभागांच्या कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. राज्यात आजपासून हजारो शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुमारे 30 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याची माहिती आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
राज्य सरकारी कर्मचारी (State Employees) आजपासून बेमुदत संपावर (Protest) गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी हे सर्व कर्मचारी संपावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुमारे 30 हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असून याचा ताण प्रशासनावर पडला आहे. जिल्हा परिषदेतील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले असून जुन्या कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन कर्मचाऱ्यांना देखील तीच पेन्शन योजना लागू करावी, यासाठी कर्मचारी आग्रही असून त्यामुळेच हा बेमुदत संपाचा इशारा सर्वच राज्य संघटनांनी दिला आहे. यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. दुसरीकडे नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
प्रत्येक शासकीय विभागात आज आंदोलन करुन संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव धुडकावत राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.
नाशिक मनपातील कर्मचारी कामावर, मात्र...
दरम्यन आजपासून राज्यभरात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे महसूल, आरोग्य, भूमी अभिलेख, कृषी आदी कार्यालतील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यातून देखील असंख्य कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून कामकाज सुरु ठेवले आहे. नागरिकांच्या सोयी सुविधांवर संपाचा परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेत असल्याचे उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यातील कर्मचारी संपावर
धुळे जिल्ह्यातील 9 हजार 500 कर्मचारी संपात सहभागी झाले असून आज सकाळी जिल्हा परिषदेत जमत कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली तरी आम्ही मागे हटणार नाही भले आंदोलन 50 दिवस लागले तरी चालेल कुठल्याही परिस्थितीत जुनी पेन्शन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा यावेळी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.