Nashik Bhaji Market : नाशिकमध्ये (Nashik) यंदा भाजीपाल्याची (Vegetable Market) दरात कमालीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. काही  दिवसांपूर्वी सर्वच भाजीपाल्याचा (Vegetable) भाव ग्राहकांच्या आवाक्यात होता. मात्र पुन्हा एकदा भाज्याचे दर कडाडले असून गृहिणींचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र आहे. कोथिंबीर जुडी 47 ते 50, तर शेपू, मेथी 35 रुपयाला जुडीचा दर असल्याने पालेभाज्यात कडाडल्याचे चित्र आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नाशिकसह मुंबईच्या (Mumbai) अनेक बाजारात नाशिकला भाजीपाला पोहचवला जातो. मात्र यंदा भाजीपाल्याची स्थितीत तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षात अनेकदा भाजीपाल्याच्या दरात तफावत आढळून आली. आता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहिल्याने पालेभाज्यांसह अन्य कृषीमालाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न समितीत मुख्यत्वे पालेभाज्या आणि कोथिंबिरसोबत अन्य काही भाजीपाल्याची आवक घटून दर कमालीचे उंचावले आहेत. 


मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची (Nashik) ओळख आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून 150 ते 200 वाहनांमधून भाजीपाला मुंबई व उपनगरांमध्ये पाठविला जातो. या वर्षी एल निनोच्या प्रभावाने पावसाला विलंब होणार असल्याचा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाले नसल्याने ग्रामीण भागात टंचाईच्या झळा बसत आहेत. उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक घटते. दरम्यान नाशिकच्या घाऊक बाजारात कोथिंबिरला प्रती 100 जुड्या सरासरी 4700 रुपये, मेथी 3300, शेपू आणि कांदा पात प्रत्येकी 3500 रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात हेच दर जवळपास दीड ते दोनपट होत असल्याने गृहिणींचे आर्थिक गणित विस्कटले आहे.


असा आहे आजचा दर 


दरम्यान पाऊस येण्यासाठी तीन चार दिवसांची वाट पाहावी लागणार असल्याचा अंदाज आहे. मात्र पावसाअभावी भाजीपाल्याची तशीच स्थिती आहे. सध्या प्रामुख्याने हिरव्या पालेभाज्यांबरोबर अन्य भाजीपाल्याची आवक सुमारे 25 टक्के घटल्याचे बाजार समितीचे सचिव अरूण काळे यांनी सांगितले. बाजार समितीच्या दैनंदिन आवकवर नजर टाकल्यास स्थिती लक्षात येते. बाजार समितीत एका दिवसात कोथिंबिर 6540 जुड्या, मेथी 5500, शेपू 6800, कांदापात 6 हजार 100 जुड्या अशी आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरला प्रतिजुडी 47, मेथी 33, शेपू 35 आणि कांदा पात 35 रुपये जुडी आहे.


पालेभाज्या दर कडाडले.... 


कोथिंबिरसह पालेभाज्यांचे दर कमालीचे उंचावल्याने किरकोळ विक्रेते त्यांच्या लहान जुड्या करून विक्री करतात. रविवारी समितीतील किरकोळ बाजारात कोथिंबिर अक्षरशः शोधावी लागत होती. तीन, चार जणांकडे ती उपलब्ध होती. लहानशी जुडी 60 ते 70 रुपयांना होती. अन्य पालेभाज्याही किरकोळ बाजारात एका जुडीच्या दोन जुड्या करून विकल्या जात आहेत. पालेभाज्यांप्रमाणे आल्याची स्थिती आहे. आल्याची दिवसभरातील आवक केवळ 30 क्विंटलवर आली असून त्यास प्रति किलोला सरासरी 145 रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात तेच आले 180 रुपयांनी विकले जात आहे.