Child Trafficking : मानवी तस्करी (Child Trafficking) प्रकरणात बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याविषयी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मुलांची आता लवकरच सुटका होऊन ही मुले त्यांच्या पालकांच्या ताब्यात मिळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. मुलांचा ताबा घेण्यासाठी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दाखल झालेले पालक आता बिहारमधील आपल्या गावी रवाना झाले आहेत. त्यामुळे लवकरच ही मुले आईच्या कुशीत विसावणार आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात शिताफीने मुलांना ताब्यात घेण्यात आलं. यानंतर मानवी तस्करीचे प्रकरण राज्यभरात गाजलं. या मानवी तस्करी प्रकरणात भुसावळ रेल्वे पोलिसांनी (Bhusawal Railway Police) 29 मुलांना बाल निरीक्षण गृहात ठेवले होते. या मुलांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी बिहारमधील त्यांचे पालक जळगाव येथे दाखल झाले होते. मात्र थेट पालकांच्या ताब्यात देण्यात कायदेशीर अडचण असल्याचं सांगत जळगाव बालकल्याण समितीने ही मुले बिहारमधील त्यांच्या अरेरिया आणि पूर्णिया जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला होता. 


दरम्यान बिहारमधील (Bihar) बालकल्याण समितीकडून त्यास लेखी स्वरुपात हिरवा कंदील मिळत नसल्याने या मुलांचा मुक्काम जळगाव येथे वाढला होता. रोज कायदेशीर अडचण सांगितल्या जाऊन मुलांची सुटका होत नसल्याने त्यांच्या पालकांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र बिहारमधील बाल कल्याण समितीने ही मुले राहत असलेल्या मूळ पालकांचा तपास करुन त्याचा अहवाल जळगाव बाल कल्याण समितीला पाठवत आपल्या ताब्यात देण्यात यावी, अशा स्वरुपाचे पत्र जळगाव बाल कल्याण समितीकडे दिले होते. मात्र आता या मुलांचा त्यांच्या पालकांकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं मानलं जात आहे. 


तसेच मुलांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी बालकल्याण समितीने पोलिसांकडे केली आहे. हा बंदोबस्त मिळाला आणि रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळाले की ही मुले तातडीने बिहारमधील बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या ताब्यात देण्यात येतील, अशा स्वरुपाची माहिती महिला बाल कल्याण अधिकारी विजय परदेशी यांनी दिली आहे. 


मुले बिहारकडे रवाना होणार 


महिला बाल कल्याण अधिकारी या बालकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी म्हटलं आहे की, एकंदरीत ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, मात्र बिहारमधील बालकल्याण समितीकडून त्या कायदेशीर बाबी पूर्ण करण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया लांबली होती. मात्र आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने ही मुले आता पोलीस बंदोबस्तात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस बंदोबस्त मिळाला. रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळाल्यानंतर ही मुले बिहारकडे रवाना होणार आहेत. मात्र झालेली कारवाई ही चुकीची झाल्याने या पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी नसल्याचे पालकांनी म्हटले आहे. 


चांदवड न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी 


मुस्लीम मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख म्हणाले की, याच घटनेत भुसावळ रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या मोहम्मद अंजर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे, याबाबत न्यायालय काय भूमिका घेते याकडे ही सगळ्यांचे लक्ष लागून आहे. चाईल्ड ट्रॅफिकिंगच्या संशयावरुन मनमाड रेल्वे पोलिसांनी 30 मे रोजी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान या संशयितांची पोलीस कोठडी आज संपते आहे. त्यांना दुपारी चांदवड न्यायालयात हजर केलं जाणार असून महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. तर मनमाड पोलिसांचे बिहारला गेलेले पथकही महाराष्ट्रात परतले असून तपासात पालकांचे जबाब आणि संशयित आरोपींबाबतही चौकशी करण्यात आली आहे.