Nashik News : नाशिकमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपकडून बाईक रॅली, मंत्री महाजन यांची बुलेटवरून 'विना हेल्मेट' सवारी
Nashik News : नाशिकमधे हेल्मेटसक्ती नाही, असे वाटल्याने हेल्मेट न घालता गाडी चालविल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन दिली.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) भाजपच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. मात्र यावेळी गिरीश महाजन विना हेल्मेट रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी महाजनांना याबाबत विचारले असता नाशिकमधे हेल्मेटसक्ती नाही, असे वाटल्याने हेल्मेट न घालता गाडी चालविल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आज मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात आला. नाशिकमध्ये यंदाही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी आज विविध कार्यक्रमांना देखील हजेरी लावली. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने नाशिकमधे भाजपच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली होती. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. गंगापूर रोडवरील (Gangapur Road) शहिद स्मारक पासून रॅलीला सुरुवात झाली. पाथर्डी फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर पुतळाजवळ रॅली विसर्जित करण्यात आली.
दरम्यान एकीकडे राज्य सरकारकडून ध्वजारोहणासाठी मंत्र्याची यादीच जाहीर केली होती. यानुसार अचानकपणे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना डावलत पुन्हा मंत्री गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. त्यामुळे पालकमंत्री बदलाच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत. अशातच आज नाशिक शहरात भाजपाने रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तर गिरीश महाजन यांच्यासह इतरही पदाधिकारी हेल्मेट न परिधान करता रॅलीत सहभागी झाले होते. त्यावर महाजन यांना विचारले असता सकाळपासून शहरात कोणी हेल्मेट घालून गाडी चालविताना दिसले नाही. नाशिकमधे हेल्मेटसक्ती नाही, असे वाटल्याने हेल्मेट न घालता गाडी चालविल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नाशिक वाहतूक पोलिसांवर प्रश्नचिन्ह
त्यामुळे एकीकडे नाशिक शहरात शहर पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई सुरु असताना दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनीच पोलीस यंत्रणेचे वाभाडे काढल्याचे यावरून दिसून आले. शहरात कुणीही हेल्मेट घालून गाडी चालवताना आढळून आले नसल्याचे सांगत नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकमध्ये वाहनधारक कुणालाही न जुमानता वाहने चालवत असल्याचे महाजन यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास आले.
गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण
मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशासह महाराष्ट्रात आणि आपल्या नाशिकमध्येही क्रांतीकारक घडना घडल्या. स्वातंत्र्य संग्रामात नाशिक जिल्ह्यातील वीरांची भूमिका महत्वाची आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे नाशिकचे भूषण आहे. त्याचप्रमाणे येवला येथील जन्मभूमी असलेले तात्या टोपे, कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थिएटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या सारख्या जिल्ह्यातील ज्ञात व अज्ञात असलेल्या क्रांतिकारांचे बलिदान आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे महाजन म्हणाले.