(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये चोरांचा झाला पोपट, भल्या पहाटे ज्वेलर्सचं दुकान फोडलं पण...
Maharashtra Nashik Crime News : नाशिकमध्ये चोरटयांनी मेहनत घेत लोखंडी दरवाजा तोडत दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला, खरा...
Maharashtra Nashik Crime News : नाशिक (Nashik) शहरात चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. मात्र आज झालेल्या चोरीत चोरटे चोरी (Theft) करून फसल्याची घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी केल्यानंतर दागिने नकली असल्याचे समोर आल्यानंतर चोरांचा पोपट झाला.
नाशिक (Maharashtra Nashik Crime News) शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांसह पोलिसांना देखील चोरटयांनी आव्हान दिले आहे. असे असताना नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात चोरीची घटना घडली आहे. बिटको चौक परिसरात असलेल्या ज्वेलर्स शॉपमधून (Jewelers) भल्या पहाटे नियोजन करून चोरी केली. त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. मात्र चोरटयांनी जेव्हा चोरलेले दागिने निरखून पाहिले असता त्यांचा पोपट झाल्याचे त्यांना समजले. चोरी केलेले दागिने नकली असल्याचे लक्षात येताच चोरांनी तोंडावर हात मारून घेतला.
नाशिक (Maharashtra Nashik Crime News) शहरातील येथील बिटको चौकात (Bitco Hospital) असलेल्या जलधारा बिल्डिंगमधील काजळे ज्वेलर्स नावाचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की, बिटको चौकात असलेल्या उड्डाणपुलाजवळ जलधारा बिल्डिंगमध्ये काजळे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सदर दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास शटर व ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला. तत्पूर्वी या चोरट्यांनी दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील सोन्याचे डुप्लिकेट दागिने तसेच वनग्राम व काही चांदीचे दागिने असा सुमारे पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सदर चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपींनी वापरलेली गाडी औरंगाबाद येथील असल्याचे समजते. तसेच चोरटे सुद्धा सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून चोरीसाठी वापरण्यात आलेल्या गाडीचा नंबर सुद्धा पोलिसांना मिळाला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी उपनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Maharashtra Nashik Crime News : मेहनत घेतली मात्र...
नाशिकच्या बिटको सिग्नल परिसरातील काजळे ज्वेलर्समध्ये आज पहाटेच्या सुमारास चोरी करण्यासाठी आलेल्या एका टोळीने मोठी मेहनत घेत बाहेरील लोखंडी दरवाजा तोडत दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला, सिसीटिव्ही फुटेज कोणाच्या हाती लागू नये म्हणून सर्वप्रथम कॅमेरा तोडून डिव्हीआरही ताब्यात घेतला. मात्र एवढी मेहनत घेतल्यानंतर त्यांच्या हाती फक्त पंधरा हजार रुपयांचे एक ग्रॅमचे नकली दागिने लागल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. सकाळी दुकानात वर्तमानपत्र टाकण्यासाठी मुलगा येताच हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरांचा शोध पोलीसांकडून सुरू आहे.