Nashik Tushar Bhosale : जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) नावाचा माणूस हा वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदू धर्माला टार्गेट करत असतात. तसेच जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या सण उत्सवांना बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोक्का लावून त्यांना तडीपार करावं अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरुन, ट्वीटवरुन अनेकदा राजकारण पेटल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वादाला तोंड फुटले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai) झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "रामनवमी, हनुमान जयंती केवळ दंगली घडवण्यासाठीच झालीत की काय?" आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 'दंगलीकरता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असे म्हणणे, हा रामभक्तांचा अपमान असल्याची टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली. तसेच तुम्ही काही ठरवलं आहेत का? दंगली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.


हिंदूंच्या सण, उत्सवांना बदनाम करण्याचा प्रयत्न : तुषार भोसले


यावर नाशिक येथील भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी देखील धारेवर धरले आहे. तुषार भोसले म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस हा वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदू धर्माला टार्गेट करत असतो आणि आता तर रमजानच्या वेळेलाच असं बोलले की राम नवमी आणि हनुमान जयंती दंगलीसाठीच असतात आणि येणाऱ्या वर्ष हे दंगलींचं वर्ष असेल, हे म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आहे. जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या सण, उत्सवांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोक्का लावून त्याला तडीपार करावं अशी आमची मागणी आहे."


मी विचारपूर्वकच वक्तव्य केलं... 


अनेक दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांची वक्तव्ये आणि ट्वीटमुळे अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. असाच नवा वाद त्यांच्या कालच्या वक्तव्यानेही सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती आणि दंगल यावरुन त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाल्याचेच चित्र आहे. जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपने आव्हाडांविरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारही केली. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही आव्हाडांना खडेबोल सुनावलेत. मात्र आव्हाड हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम असून मी विचारपूर्वकच वक्तव्य केलं असल्याचा दावा आव्हाडांनी केला आहे.