Nashik Gangapur Dam : देशभरात उत्साहात ईद साजरी (Eid) होत असताना नाशिक (Nashik) शहरात अघटित घटना घडली आहे. ईदच्या सुट्टीनिमित्त मित्रपरिवारासह गंगापूर (Gangapur Dam) बॅकवॉटर परिसरात पाहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर दुसऱ्या युवकाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक शहरात ईदसह अक्षय्यतृतीयेचा (Akshayya Trutiya) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शहरातील शहाजहान ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी हजारो मुस्लीम बांधवानी नमाज अदा केली. यानंतर अनेकांनी ईद सणाचा आनंद घेतलं. अशातच दुपारनंतर रमजान ईदनिमित्त असलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गंगापूर धरणाच्या बॅक वॉटर (Gangapur Dam Back Water) भागात मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या नाशिक रोडच्या 14 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेत दुसऱ्या मित्राला वाचवण्यात यश आले असून, याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
पाय घसरुन पुन्हा पाण्यात पडले अन् ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिबाज नेहमतअली खान असे मृत मुलाचे नाव आहे. विहितगाव येथे राहणारा साहिबाज खान आणि काही मित्र ईदच्या सुट्टीनिमित्त गंगापूर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात फोटो काढले. काही वेळानंतर त्यांनी पोहण्याचे ठरवले. त्यानुसार ते पाण्यातही उतरले. बराच वेळ त्यांनी पोहून झाल्यानंतर किनाऱ्यावर पोहोचले. यावेळी साहिबाज आणि मुशाहिद खान हे दोघेजण किनाऱ्यावर असताना अचानक पाय घसरुन ते पुन्हा पाण्यात पडले. यावेळी खान यास अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला ही बाब लक्षात येताच दुसऱ्या मित्राने त्याला वाचवण्याच्या नादात पाण्यात उडी घेतली, परंतु त्यालाही अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब काठावरील मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.
एकाला वाचवण्यात यश, दुसऱ्या मुलाचा मृत्यू
दरम्यान मुलांचा आवाज ऐकून धावून आलेल्या परिसरातील नागरिकांनी दोघांना पाण्याबाहेर काढले, मात्र तत्पूर्वीच साहिबाज याचा मृत्यू झाला. यातील दोघांनाही पोहता येत नसल्याने त्याच्या मित्रांनी सांगितले. सायंकाळी चार वाजेच्या ही घटना घडली असून या दोघांना वाचवण्याचा मित्रांनी प्रयत्न केला, तेवढ्यात सुरक्षारक्षक देखील घटनास्थळी पोहोचले. मात्र एकाला वाचवण्यात यश आले तर साहिबाज खान याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन ईद सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून सणाच्या दिवशी आनंद घेण्यासाठी गेलो असता ज्याची कुणी कल्पनाही केली नाही, अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.