(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : दुचाकीत हवा भरण्यावरुन वाद, नाशिकच्या जेजुरकर मळा परिसरात गॅरेज चालकाला संपवलं!
Nashik Crime : दुचाकीत हवा भरून न दिल्याने गॅरेज चालकाला संपवल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे.
Nashik Crime : नाशिक शहरात (Nashik) गुन्हेगारीचा आलेख वाढतच असून शहरात गेल्या तीन दिवसांत खुनाची (Murder) दुसरी घटना घडली आहे. शहरातील टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर तिघा मद्यपींनी वाहनात हवा भरुन दिली नाही या कारणावरुन पंक्चर दुकानदारावर त्याच्याच दुकानात हल्ला करुन भोसकून ठार मारल्याची घटना शनिवारी (29 एप्रिल) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली.
नाशिक शहरासह (Nashik Crime) जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पोलीस यंत्रणा रोजच नवनवीन गुन्हे उघडकीस आणण्याचे काम, खुनाच्या घटनेतील गुन्हेगारांना ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. मात्र दुसरीकडे गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांचा वचकच नसल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून टाकळीगावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हल्लेखोरांनी पंक्चर दुकानदाराच्या (Garage) छातीत धारदार शस्त्राने भोसकून त्याचा खून केला. या हल्ल्यात मूळ बिहारचा रहिवासी गुलाम मोहम्मद रब्बानी याचा मृत्यू झाला.
शहरातील तपोवन शिवारातील हॉटेल मिरची ते टाकळीरोडकडे जाणाऱ्या जेजुरकर लॉन्स ते रिंगरोडवर साई मोटार गॅरेज आहे. या गॅरेजबाहेर गुलाम रब्बानी याचे पंक्चर दुकान आहे. आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवन जेजुरकर मळा हा रिंगरोड रात्री निर्जन असतो. यावेळी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर हवा भरण्याच्या उद्देशाने गॅरेजवर आले, यातून वाद होऊन तिघांनी गॅरेज चालकावर हल्ला केला. पोटात छातीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
संशयित दुचाकीवरुन पळाले
दरम्यान आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवन जेजुरकर मळा हा रिंगरोड रात्री निर्जन असतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अनेक मद्यपी, हुल्लडबाजी करणारे तरुण फिरत असतात. अशावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेकांना लुटल्याचे प्रकार समोर आले आहेत. काल रात्री गुलाम रब्बानी याला मारहाण करत असताना रस्त्याने जाणाऱ्या काहींनी ही घटना बघितली. संशयितांनी गुलाम याच्यावर हल्ला केला, तेव्हा आरडाओरडही सुरु होती. त्या दरम्यान संशयित दुचाकीवरुन पळाल्याची चर्चा होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघांना ताब्यात घेतले. घटनेनंतर संशयित फरार झाले होते; मात्र त्यातील तिघा संशयितांना पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून रात्री उशिरा ताब्यात घेतले.