Nashik News : सद्यस्थितीत नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) 64 टक्के इतका जलसाठा असला तरी आगामी काळात अल निनो वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने  पाणी टंचाई व कडक उष्णतेचा दिलेला इशारा दिला आहे. त्यानुसार नाशिक शहरातील पाणी कपातीबाबत महापालिकेकडून (Nashik NMC) आज निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्याची ओळख संपूर्ण राज्यात आहे. सर्वाधिक धरणे आणि पाणीसाठा (Water Storage) हा नाशिकमध्ये होत असतो. त्यात महत्वाची बाब म्हणजे मुंबईसह (Mumbai) मराठवाड्यात देखील नाशिकमधील धरणातून पाणी दिले जाते. सध्या गंगापूर धरण समूहात 64 टक्के तर जिल्ह्यातील धरणाची सरासरी 48 टक्के इतके पाणी आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत धरणांमध्ये 54 टक्के इतका जलसाठा होता. त्यामुळे आगामी आवर्तने व उन्हाळ्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनाचे प्रमाण पाहता ग्रामीण भागातही पाणी टंचाई उभी राहू शकते. नाशिक शहरात हा धोका नसला तरी, अल निनो वादळाचा हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता गेल्या आठवड्यातच राज्य सरकारने सर्व नगरपालिका, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाला पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


तज्ज्ञांच्या मते यंदा उष्णतेचे प्रमाण अधिक राहणार असून,  पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. उष्णतेचे प्रमाण पाहता धरणातील पाण्याचे अधिक वाष्पीभवन होऊन मोठी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याबरोबरच जनतेतही पाणी बचतीविषयी जागृती करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी महापालिका, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध साठा व आगामी काळात लागणारे पाणी याचा आढावा घेतला असता, त्यात सर्व विभागांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 


पाणीकपातीवर आज मंत्रालयात बैठक 


याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्याच्या मुख्य सचिवांनी या संदर्भात बैठक बोलविली आहे. या बैठकीत पाणी कपातीवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता दरवर्षी 31 जुलै अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. यंदा ऑगस्टपर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार असून, त्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेण्याची येणार असल्याची शक्यता आहे. यानुसार नाशिक महानगरपालिकेने राज्य शासनाकडे प्रस्तव पाठविला आहे. याबाबत आज बैठक पार पडणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.