Nashik Crime : नाशिक शहरातील (Nashik City) सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शहर अंतर्गत बदल्या (Police Transfers) करण्यात आल्या असून यात पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंनी (Ankush Shinde) बदलीचे आदेश काढले आहेत. प्रशासकीय कारण दिले जात असले तरी मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे निर्णय घेतला असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. 


नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारी (Crime) वाढत असून पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. अशातच शहरात अनेक पोलीस ठाण्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या.  नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी विविध पोलीस ठाण्यांच्या सहायक पोलीस निरीक्षकांची बदली केली गेली होती. आता नाशिक शहर पोलीस (Nashik Police) ठाण्यांतही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात बहुचर्चित अंबड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी स्थानापन्न झालेल्या युवराज पत्की यांची अल्पावधीतच बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सूरज बिजली यांची बदली करण्यात आली आहे. 


याचबरोबर शहरातील सातपूर, इंदिरानगर, पंचवटी, मुंबईनाका, नाशिकरोडसह सायबर पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी सायबर क्राईमचे पोलीस अधिकारी सूरज बिजली यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांत सातपूर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी यांच्या जागी उपनगर पोलीस ठाण्याचे पंकज भालेराव यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अनिल शिंदे यांना पदभार देण्यात आला आहे. 


तर अंबडचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांना मुंबई नाका पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. गणेश मधुकर न्याहदे यांना इंदिरानगर पोलीस ठाण्याचा तर, देविदास वांजळे यांना नाशिकरोड पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. या पोलीस ठाण्याचे पूर्वीचे पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. तर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांची बदली सायबर क्राईम पोलिसांत करण्यात आली आहे. 


नियंत्रण कक्षातील महिला पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांना चुंचाळे पोलीस चौकीत, तर आर्थिक गुन्हे शाखेचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना चुंचाळेचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. अभियोग  कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पवन चौधरी यांची नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.