Nashik News : नाशिकमध्ये मीटर दुरुस्त करणारे सहाच दुकानदार, रिक्षा मीटर सक्तीला महिनाभराचा ब्रेक
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) रिक्षा मीटर सक्तीचा निर्णय महिनाभर पुढे ढकलण्यात आला आहे.
Nashik News : आजपासून म्हणजेच 01 डिसेंबरपासून नाशिकमध्ये (Nashik) ऑटोरिक्षाचे मीटरप्रमाणे भाडे (Auto Rickshaw) आकारले जाणार होते. या संदर्भातील निर्णयही झाला होता. मात्र अचानक आता या निर्णयाला महिनाभराची स्थगिती देण्यात आली असून पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणे रिक्षा भाडे आकारण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी मीटरप्रमाणे (Meter) भाडे आकारण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे.
नाशिकमध्ये शहरात आजमितिस 12 हजाराहून अधिक रिक्षा आहेत. त्यामुळे शहरात अनेक भागात प्रवाशांना ने आण करण्यासाठी रिक्षाचा वापर होत असतो. मात्र अनेकदा प्रवाशांकडून रिक्षा चालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारात असल्याचे निदर्शनास आले आहे. तर दुसरीकडे राज्यभरात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती असल्याने रिक्षा भाडे मीटरप्रमाणे आकारण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आला होता. त्या संबंधीच्या सूचना त्या त्या जिल्ह्याच्या वाहतूक विभागाला देण्यात आलेल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आजपासून रिक्षा भाडे मीटरप्रमाणे आकारण्यात येणार होते. मात्र हा निर्णय महिनाभर पुढे ढकलण्यात आल्याचे समजते आहे.
दरम्यान राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रिक्षाचालकांनी प्रवास भाडे मीटर प्रमाणेच आकारावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नाशिकमध्येही या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आजपासून म्हणजेच 01 डिसेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, शहरात रिक्षाचे मीटर दुरुस्त करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच असल्याने अनेक रिक्षांचे मीटर दुरुस्त झालेले नाहीत. त्यामुळे आजपासून मीटरप्रमाणे भाडे आकारणे अशक्य असल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान मीटर दुरुस्तीसाठी महिनाभराचा कालावधी यासाठी देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात साधारणपणे अंमलबाजवणीला सुरुवात केली जाणार आहे.
नाशिक शहरसह जिल्ह्यात आजच्या घडीला रिक्षाचालक प्रवाशांकडून नेहमीप्रमाणे भाडे आकारात आहेत. मात्र अनेकदा रिक्षाचालक मनमानी करून प्रवाशांना लुबाडत असल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे शहरात येणाऱ्या पर्यटकांकडून देखील रिक्षाचालक अवाजवी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी वाहतूक विभागाला प्राप्त झाल्या होत्या. शिवाय राज्यभरात अशी परिस्थिती असल्याने अनेक तक्रारीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाने मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून मीटर बंद अवस्थेत असल्याने दुरुस्तीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी रिक्षाचालकाकडून करण्यात आली. शिवाय शहरातील रिक्षाचे मीटर दुरुस्ती करणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याने मीटर दुरुस्तीसाठी वेळ लागणार असल्याचे वाहतूक विभागाने सांगितले. त्यानुसार नाशिक शहरात 1 डिसेंबर पासून मीटर प्रमाणे होणारी भाडे आकारणी महिनाभरासाठी स्थगित करण्यात आली आहे.
निर्णय दोन महिने लांबणीवर
एकीकडे रिक्षाचालकांकडून वारंवार प्रवाशांना लुबाडले जात असताना आता रिक्षा भाडे मीटरप्रमाणे आकारण्यात येणार आहे. यासाठी रिक्षा चालक-मालक संघटनानी प्रादेशिक परिवहन विभागाला भाडे वाढ करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मीटरप्रमाणे भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र आता मीटर दुरुस्ती झाल्याशिवाय अंमलबजावणी करता येणार असल्याचे समोर आले. तर दुसरीकडे नाशिककरांचा मात्र या निर्णयाला विरोध होत आहे. निर्णय दोन महिन्यावर गेल्याने पुढची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागून आहे.
अधिकृत सहाच दुकानदार
नाशिक शहरातील सर्वच रिक्षांचे मीटर अपडेट करणे एक डिसेंबरपर्यंत अशक्य असून मीटर दुरुस्त करणारे अधिकृत सहाच दुकानदार असल्याचे निवेदन ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सुनिल बागुल व श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन आधिकाऱ्यांना दिले हाेते. त्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरण. डी यांनी अपडेटेड मीटरसाठी दाेन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे नाशिककरांसह रिक्षाचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तसेच रिक्षा चालकांना एक जानेवारीपर्यंत रिक्षाला मीटर बसवावेच लागणार आहे.