(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik City Link : एकतर पगार द्या, नाहीतर राजीनामा घ्या! नाशिक सिटी लिंक कर्मचारी संतापले!
Nashik City Link : नाशिक (Nashik) सिटी लिंकच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारत राजीनामा देण्याचे ठरविले आहे.
Nashik City Link : नाशिक (Nashik) महानगरपालिकेच्या परिवहन महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन (Protest) पुकारले असून या कर्मचाऱ्यांनी राजीनाम्याचा (Resign) इशारा दिला आहे. शिवाय दोन महिन्यांपासून वेतनच मिळत नाही असा दावा या कर्मचाऱ्यांनी आहे.
दरम्यान दोन महिन्यापूर्वी नाशिकच्या सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी पगार नसल्याने आंदोलन पुकारले होते. त्यानंतर आज पुन्हा वाहक आणि चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आज सकाळपासून काम बंद आंदोलन केलेलं होतं काही कर्मचारी अद्यापही कामावर रुजू आहेत. मात्र बहुसंख्या कर्मचारी आता आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत. गेल्या दोन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर आज आंदोलन केल्याने शंभर ते दीडशे कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
नाशिक शहरात कोरोना काळात नाशिक मनपाच्या (Nashik NMC) वतीने सिटी लिंक शहर बससेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर ठेकेदारांकडून या बससेवेसाठी कंत्राटी पद्धतीने अनेक वाहक आणि चालकांची भरती केली. मात्र त्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार थकीत राहत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी जाब विचारला असता चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आरोप कर्मचाऱ्यांनी करत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यावेळी आंदोलक म्हणाले कि, दोन दिवसापूर्वी आमच्या मागण्यासाठी आम्ही राजीव गांधी भवन आयुक्त, पोलीस आयुक्त, कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यानंतर पगार एक ते दहा तारखे दरम्यान होईल असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र दोन दोन महिने होऊनही पगार होत नसल्याने आंदोलन पुकारल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे सिटी लिंक बसेवेत कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आल्यानंतर अनेक कर्मचाऱ्याकडून पगार वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. तसेच अनेक भागात कर्मचाऱ्यांच्या युनियन आहेत. मात्र संबंधित भागातील कर्मचारी हे आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहेत. आजचे आंदोलन हे तपोवन परिसरात काम करणारे कर्मचारी करत असून यातही अनेक कर्मचारी दंड होईल या भीतीने कामावर रुजू आहेत. तर काही कर्मचारी हे आंदोलन करत आहेत. आंदोलन करण्यासाठी आलेल्या कर्मचार्याना दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. याचबरोबर या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे राजीनामे देखील तयार केले असून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार असल्याचे आंदोलकी म्हणाले. त्यामुळे आता सिटी लिंक हस्तक्षेप करून काही तोडगा काढते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
एक आंदोलन, दहा हजारांचा दंड?
गेल्या दोन वर्षांपासून सुरु झालेली सिटी लिंक शहरबससेवा नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील सिटी लिंक संदर्भातील घटनांमुळे शहर बस सेवा चर्चेत आहे. शिवाय दोन महिन्यात कर्मचाऱ्यांचे दोन आंदोलन होत असल्याने सिटी लिंक बस प्रशासन वादात सापडले आहे. आताही कर्मचाऱ्यांचा दोन महिन्याचा पगार, दिवाळी बोनस काहीही न दिल्याने आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. एकतर पगार द्या नाहीतर राजीनामा घ्या अशी भूमिका घेतली आहे. मात्र आंदोलन केल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने दहा हजारांचा दंड ठोठावल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.