Nashik Crime : धुळे (Dhule) येथील लळिंग येथील टोल प्लाझाचा (Toll Plaza) वित्तीय अधिकारी हरीश सत्यवली यास 32 लाख रुपयांच्या परताव्यासाठी सात लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. संबंधित कंपनीच्या दिल्ली (Delhi) येथील संचालकाविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.


नाशिकसह (Nashik) विभागात एसीबीने (ACB) कारवाईचा धडाका सुरु केला असून धुळ्यातील कारवाई ही राज्यातील खासगी कंपनीविरोधातील पहिली कारवाई असल्याचे समोर आले आहे. इरकॉन सोमा टोल वे असे या नवी दिल्ली स्थित कंपनीचे नाव असून या कंपनीचे संचालक प्रदिप कटीयार (Pradip Katiyar) हे एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. या कंपनीचे वित्तीय अधिकारी हरिश सत्यवली यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःसह संचालक प्रदीप कटियार यांच्यासाठी सात लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती, ही लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.


इरकॉन सोमा टोलवे या कंपनीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बांधा, चालवा व हस्तांतरीत करा या तत्वावर करारनामा केला आहे. सदर कंपनीने उदयपूर, राजस्थान येथील कोरल असोसिएटस या कंपनीस 22 सप्टेंबर 2022 रोजी नॅशनल हायवे क.3 (मुंबई-आग्रा) यावर असलेला नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील टोल प्लाझाचे संपूर्ण व्यवस्थापन करण्याचा करारनामा केला आहे. सदर कंपनीने तकारदार यांना 25 सप्टेंबर 2022 रोजी मुखत्यार पत्राव्दारे चांदवड टोल प्लाझाचे संपूर्ण व्यवस्थापन व त्यासबंधी कागदोपत्राचे अधिकार प्रदान केले आहेत. 


दरम्यान लळिंग येथील टोल प्लाझाच्या व्यवस्थापनाची निविदाही कोरल असोसिएट या कंपनीने भरली आहे. ती निविदा मंजूर व्हावी आणि डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 पर्यंतच्या परताव्याचे 32 लाख मिळावे. यासाठी कोरल कंपनीचे अधिकारी मूळ कंपनीच्या लळिंग येथील मुख्य कार्यालयातील सत्यवली यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सत्यवली यांनी लळिंग इरकॉन सोमा टोलवेच्या मुख्य कार्यालयात तक्रारदार यांच्याकडे स्वतः साठी 2 लाख रुपये व दिल्लीचे संचालक प्रदिप कटीयार यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यानी 21 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात या प्रकरणी तकार दिली होती.


त्यानुसार तक्रार यांनी दिलेल्या तक्राराची आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान इरकॉन सोमा टोल वे कंपनीचे संचालक प्रदिप कटीयार यांनी मोबाईलव्दारे संभाषण ट्रॅप केले. त्यानुसार सदर कंपनीचे हरिष सत्यवली यांना तक्रारदार यांच्याकडून सात लाख रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.