Nashik HSC Exam : बारावीचा इंग्रजीचा पहिलाच पेपर (HSC Exam) देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे दुचाकीच्या डिक्कीत आणि बाहेर बॅगमध्ये ठेवलेले तब्बल अकरा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी (Mobile Theft) चोरून नेल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये मंगळवारी घडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बारावीला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना सोबत मोबाईल आणू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.


नाशिकसह (NashiK) राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली असून  मंगळवारी इंग्रजीचा पेपर (English Pepar) झाला. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सकाळी 11 वाजता असल्याने बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूल येथे पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाकडून त्यांच्या बॅग आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मोबाईल बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तर काही विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके व मोबाईल असलेली बॅग शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर ठेवली; मात्र दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी बॅगा व दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग घेण्यासाठी गेले. त्यावेळी मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. 


दरम्यान ही घटना नाशिक शहरातील नावाजलेल्या नाशिकरोड (Nashikroad) परिसरातील बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूलमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या अकरा विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडली आहे. या विद्यार्थ्यांनी मोबाईल चोरी प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक बाहेर असतानाही चोरट्यांनी 11 मोबाईलची चोरी केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


विद्यार्थ्यांना मोबाईल चोरीचा फटका


बदलत्या काळानुरूप आधुनिक युगात मोबाईल ही सर्वाधिक गरजेची गोष्ट बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत मोबाईल बाळगणे स्वाभाविक आहे; मात्र शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बॅग ठेवण्यास सांगितले असते तर त्यांचे मोबाईल चोरीला जाण्यापासून वाचू शकले असते. परंतु थेट शाळा, महाविद्यालय बाहेर बॅगा ठेवण्यास सांगितल्याने विद्यार्थ्यांना मोबाईल चोरीचा फटका बसला आहे.


कॉपी मुक्त अभियान राबवलं मात्र... 


बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. परीक्षेपूर्वीपासून विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून अभ्यासाच्या ताणतणावात वावरत होते. क्लास, कॉलेजचे लेक्चर, प्रॅक्टिकल, चाचणी परीक्षा, अशा अनेक दिव्यातून जात असताना विरंगुळा म्हणून कधी कधी मोबाईलचा वापर करीत होते. अर्थात, मोबाइलचे महत्त्व आता प्रत्येक घटकाला पटू लागले असल्याने मोबाईल नसणारी व्यक्ती सापडणे तशी दुर्मीळच. त्यामुळेच की काय, मोबाईलचे महत्त्व लक्षात घेऊन ते चोरीस जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. बारावीच्या परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी, तसेच प्रश्नपत्रिका फुटू नये, म्हणून परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना मोबाइल परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी घातली आहे. परीक्षेच्या पहिल्याच पेपरला सर्वच विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेरच आपल्या शालेय साहित्याच्या बॅगा व मोबाइल वर्गाबाहेर काढून ठेवले. मात्र, चोरट्यांनी थेट तेथे प्रवेश करून धाडसी डल्ला मारला.