Nashik Rain : अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, नाशिक जिल्ह्यात 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा जोरदार बसला असून शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nashik Rain : गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा जोरदार बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार दोन दिवसांच्या अवकाळीने तब्बल 2600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर (Farmer) दुहेरी संकट ओढवले आहे.
राज्यभरात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून राज्यातील विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे आहे. आजही अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय हवामान विभागाच्या (IMD Weather) अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून नाशिक (Nashik District) जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. तर आणखी दोन दिवस या अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र मागील दोन ते तीन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बागलाण, सटाणा, देवळा, मनमाड, त्र्यंबक आदी भागातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष अशा रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सर्वाधिक गहू पिकाचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेला गहू, हरभरा व इतर रब्बी पिके भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील दोन दिवसात बाधित झालेले 191 गावे व संभाव्य बाधित होणाऱ्या गावांमध्ये अंदाजे 2600 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असल्याने कष्टकरी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दरम्यान अवकाळी पावसात सर्वाधिक 1 हजार 803 हेक्टवरील गव्हाचे नुकसान केले आहे. त्यापैकी 1 हजार 745 हेक्टर क्षेत्र निफाड तालुक्यातील, तर 58.30 हेक्टर क्षेत्र नाशिक तालुक्यातील आहे. निफाडमधील 660 तर नाशिकमधील 117 अशा 777 हेक्टवरील द्राक्षबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. नाशिक तालुक्यातील 61.50 हेक्टरवरील कांद्याची पावसाने हानी केली आहे.
पंचनामे करण्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतींचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे, असे ही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह अवकळी पाऊस झाला. त्यामुळे कांदा पिकासह गहू, हरबरा या रब्बी पिकांचे तसेच द्राक्षबागा व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याअनुषंगाने अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र देवून केली असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.